रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
मध्य प्रदेशातून रावेरमार्गे फैजपूर येथे जाणारा गुटख्याचा साठा फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने धडक कारवाईत जप्त केला. या कारवाईत महाराष्ट्रात बंदी असलेला तब्बल ४ लाख १७ हजार रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला असून, एक आरोपीला अटक करण्यात आला आहे. तर एक फरार आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहितीवरून पहाटे सापळा
फैजपूर विभागाच्या पोलिसांना मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथून रावेरमार्गे गुटख्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस हवालदार महेंद्र महाजन, पोलीस नाईक अक्षय पवार आणि आबीद शेख यांनी पहाटे तीन वाजल्यापासून बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर तपासणी मोहीम हाती घेतली. मारुती मंदिराजवळ वाहन तपासणीदरम्यान बुरहानपूरहून आलेली ॲपे पँजो (एमएच 03 एएच 7322) पोलिसांनी थांबवली. वाहनाची झडती घेतली असता ४ लाख १७ हजार १२० रुपयांचा बंदी घातलेला गुटखा आढळून आला.
एक आरोपी अटकेत
गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची ओळख शेख वाजीद शेख आबीद (वय ३४, रा. धोबीवाडा, फैजपूर) अशी आहे. प्राथमिक चौकशीत शेख जुबेर शेख इकबाल (रा. हाजिरा मोहल्ला, फैजपूर) याच्या सांगण्यावरून हा गुटखा फैजपूरमध्ये विक्रीसाठी नेत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अक्षय पवार यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करत आहेत.
४ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ४ लाख ८१ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, त्यामध्ये २ लाख ७२ हजार २७२ रुपयांचा १,४५६ पान मसाल्याचे पाउच (विमल ब्रँड)९ हजार ६८० रुपयांचा वी-१ तंबाखू (४४० लहान पाउच) ६० हजार रुपये किमतीचे पँजो ॲपे वाहन ४ हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला आहे.
कारवाईची मागणी
रावेर शहरातही बंदी असलेला गुटखा विकला जात आहे. पोलिसांनी अशा ठिकाणी तत्काळ कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.गुटखा तस्कर साखळी जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.