माता, माती, मातृभाषा यांचा अभिमान बाळगा !
प्रा. डॉ.अनिल पाटील यांचे प्रतिपादन : भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठी भाषेला काही हजार वर्षांची परंपरा आहे. मराठीतील अभिजात साहित्य मराठी माणसांच्या मनाला संस्कारित करते. मराठी भाषा ही अमृतातेही पैजा जिंकणारी आहे.
प्रत्येकाने स्वतःच्या बोली भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. कोणतीही भाषा शुद्ध, अशुद्ध असत नाही. आपण ज्या मातीत राहतो, तेथील भाषिक संस्कार आपल्यावर होतात त्या मातृभाषेचा, आपल्या मातीचा, मातेचा अभिमान बाळगला पाहिजे असे प्रतिपादन प्रा. डॉ. अनिल पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.गणपतराव ढेंबरे म्हणाले की,मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.केवळ दर्जा मिळाला म्हणून सर्व प्रश्न सुटत नाहीत. मराठी भाषा समृद्ध व्हायचे असेल तर ती ज्ञानभाषा झाली पाहिजे असे त्यांना सांगितले. येथील श्री.व्ही.एस.नाईक कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त प्रा.सत्यशील धनले यांचे मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी सांगितले की, मराठी साहित्य फार प्राचीन आहे. विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याचा अभ्यास करावा. मराठी भाषेतील उत्तम कलाकृती वाचल्यामुळे विद्यार्थ्यांची अभिरुची समृद्ध होते. विद्यार्थी हा चौकस असला पाहिजे. त्याने समाज समजून घेतला पाहिजे. संस्कृती समजून घेतली पाहिजे असे मत प्रा. सत्यशील धनले यांनी मांडले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ. बी.जी.मुख्यदल यांनी तर आभार प्रा. सागर महाजन यांनी मानले.
यावेळी उपप्राचार्य प्रा.एस.डी. धापसे, प्रा.तेजस दसनूरकर, प्रा. विनोद राऊत, प्रा. देविदास महाजन उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. गणपतराव ढेंबरे, प्रा. एस.बी.गव्हाड, प्रा. लालसिंग वळवी, प्रा. एन.ए. घुले, युवराज बिरपण, सुनिल मेढे, एस.के. महाजन, सतीश वाघ, माया अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.