लोकशाही संपादकीय लेख
भारतातील उद्योग क्षेत्राचा बादशहा, टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचे काल ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना निधन झाले. त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारतातील जनता एका महान भारतीय सुपुत्राला मुकली, असेच म्हणावे लागेल. टाटा उद्योग समूहाचा विस्तार सर्व प्रकारच्या क्षेत्रात झाला आणि टाटा उद्योग निर्मित प्रत्येक उत्पादनाला एक प्रकारची विश्वासार्हता निर्माण झाली आहे.
भारतातील अनेक उद्योगपतींनी टाटा उद्योग समूहाचा आदर्श घेतला होता. जळगाव येथील जैन उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री भवरलालजी जैन यांनी आपल्या मुलाखतीत अनेक वेळा टाटा हे त्यांचे आदर्श असल्याचे सांगितले आहे. टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांना दत्तक घेतले होते. नवल टाटांच्या निधनानंतर रतन टाटा यांच्याकडे उद्योग समूहाची संपूर्ण जबाबदारी आली. रतन टाटांनी त्यांची इंजीनियरिंगची पदवी इंग्लंड मध्ये घेतल्यानंतर टाटा उद्योग समूहाच्या भरभराटीला पुन्हा जोमाने सुरुवात झाली. १९६२ च्या भारत चीन युद्धामुळे इंग्लंडमधील प्रेयसी भारतात आली नाही. त्यामुळे रतन टाटांचा होणारा प्रेम विवाह चार वेळा हुकला. त्यानंतर त्यांनी लग्नाचा नाद सोडून दिला आणि लग्नच केले नाही. लग्न ही एक जीवनातील महत्त्वपूर्ण बाब असताना त्याला त्यांनी विशेष महत्त्व न देता देशातील उद्योगांच्या माध्यमातून सेवा करण्याला प्राधान्य दिले. त्यांच्या मागून उद्योग क्षेत्रात आलेले अंबानी आणि अदानी तसेच इतर उद्योगपती आलिशान जीवन जगतात. कोट्यावधींच्या बंगला ते राहतात. परंतु एका नामांकित मोठ्या उद्योग समूहाचे रतन टाटा साध्या फ्लॅटमध्ये राहणे पसंत करतात. यातून माणसातील मोठेपण दिसून येतो.
देशातील ६५ टक्के जनता ही विशाल अशा आभाळाच्या छताखाली राहत असताना, आपण आलिशान घरात राहणे टाटांना पसंत नव्हते. एवढा मोठा उद्योगपती असताना स्वतःच्या अंगावर एक ग्रॅम सोने सुद्धा वापरत नव्हते. माणूस मोठा असला तरी लक्षण खोटे नव्हते. परंतु रतन टाटा स्वच्छंदी जीवन जगणारे व्यक्ती होते. त्यांना पियानो वाजवण्याची आवड होती, पण ते शिकू शकले नाहीत. विविध प्रकारच्या चार चाकी कार वापरण्याचा आणि स्वतः चालवण्याचा छंद होता. हेलिकॅप्टर तसेच विमान उड्डाण करण्याचाही त्यांना छंद होता. एकदा महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन मंत्री आताचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मुंबई येथील मलबार स्थित सहकारी निवासस्थानात भेटण्यासाठी रतन टाटा कारने निघाले. तेव्हा रतन टाटांना त्यांचा बंगला सापडत नव्हता. तेव्हा रतन टाटांनी गडकरींना फोन करून पत्ता विचारला. गडकरी टाटांना म्हणाले “तुमच्या ड्रायव्हरला फोन द्या.. माझ्या बंगल्याकडे कसे यायचे ते त्याला सांगतो..” तेव्हा रतन टाटा म्हणाले, “मेरे पास ड्रायव्हर नही है.. मै खुद कार चला रहा हु..” यावरून एवढा मोठा उद्योगपती कसल्याही सुरक्षेचा विचार न करता स्वतः मुंबईसारख्या ठिकाणी गाडी चालवतो, हा किती मोठेपणा म्हणावा. हा किस्सा अनेक वेळा नितीन गडकरींनी आपल्या भाषणात सांगितला. माणसाचे मोठेपण त्यांच्या कर्तृत्वातून दिसून येते. आताचे उद्योगपती मागेपुढे सुरक्षा रक्षकांच्या गाड्या आणि बुलेटप्रूफ गाड्यांमध्ये ड्रायव्हरच्या मागे बसलेले आढळतात. म्हणून रतन टाटा मोठे उद्योगपती असले तरी त्यांच्यातला साधा माणूस महत्त्वाचा आहे.
उद्योगपती रतन टाटांना वरळी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. गेल्या तीन-चार वर्षांपासून रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा अशी भारतातील जनतेची मागणी होती. राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्राकडे वर्षाभरापूर्वी दिला होता. तथापि वर्ष झाले तरी केंद्र शासनातर्फे भारतरत्न पुरस्कार संदर्भात काही निर्णय घेतला गेला नाही. वर्षभरापूर्वी भारतरत्न पुरस्कार देण्याचा केंद्राने निर्णय घेतला असता, तर जिवंतपणे रतन टाटांना भारतरत्न पुरस्कार मिळाला असता. राजकारणी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार ज्या तत्परतेने दिला गेला ते चांगलेच झाले. परंतु भारतातील उद्योग क्षेत्रातील बादशहा ज्यांनी आपल्या उद्योगाच्या माध्यमातून देशाची सेवा केली, त्यांना सुद्धा त्याच तत्परतेने भारतरत्न पुरस्कार दिला गेला असता तर सर्व भारतीयांना आनंद झाला असता.. असो..
उद्योगपती अंबानींच्या मुलाच्या लग्नाला आवर्जून उपस्थित राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कालच्या रतन टाटांच्या अंत्ययात्रेत भारतीय सुपुत्राचे अंतिम दर्शन घ्यायला उपस्थित राहिले नव्हते. याबाबत अनेक भारतीयांनी खंत व्यक्त केली. ते उपस्थित न राहण्याचे कारण मात्र अंतिम निरोप देईपर्यंत कळू शकले नव्हते. रतन टाटा यांचा अंत्यविधी भावनिक वातावरणात पार पडला. ४०० अब्ज डॉलर अर्थात ३५ लाख कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या रतन टाटा यांच्या महासाम्राज्याचा उत्तराधिकारी कोण होईल? याकडे आता सर्व भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर एन. चंद्रशेखर हे गेल्या सात वर्षापासून टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत. अंबानी आणि अदानी यांनी गेल्या काही वर्षात उद्योग क्षेत्रात येऊन जगातील पहिल्या दहा क्रमांकाच्या श्रीमंतांच्या यादीत आपले नाव निर्माण केले. तथापि टाटा उद्योग समूह गेल्या १०० वर्षांपासून उद्योग क्षेत्रात असून त्यांनी श्रीमंतांच्या यादीत आपला कितवा नंबर आहे? याला कसलेही महत्त्व दिले नाही. परंतु चारिटी करण्यामध्ये मात्र आपल्या वरचा क्रमांक त्यांनी प्रस्थापित केला, हे विशेष…
रतन टाटा हे कुत्र्यांचे शौकीन होते. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी टाटा उद्योग समूहाच्या वतीने स्वतंत्र हॉस्पिटल उभारणारे रतन टाटा विराळेच. प्राण्यांवर त्यांचे असलेले प्रेम यातून दिसून येते. मुंबईचे जगप्रसिद्ध ‘टाटा हॉस्पिटल’ टाटा उद्योग समूहाच्या सहकार्यानेच चालते. अश्या मोठ्या देवमाणसाने वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला. दैनिक लोकशाहीची त्यांना भावपूर्ण आदरांजली…!