परळीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला
शरद पवारांच्या कार्यकर्त्याला मारहाण : राडाच राडा
लोकशाही न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. पण काही ठिकाणी मतदानाला गालबोट लागले आहे. अनेक ठिकाणी राडा झाल्याचे देखील समोर आले आहे. दरम्यान परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. यामुळे निवडणुकीचे वातावरण तापले आहे.
मिळाल्या माहितीनुसार, परळीमध्ये शरद पवार यांच्या कार्यकर्त्याला जोरदार मारहाण झाली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परळीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे मैदानात आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेसाहेब देशमुख यांचं आव्हान आहे.
बीडच्या परळी मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाचे कार्यकर्ते माधव जाधव यांना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर व्हायरल होतोय. आज मतदान प्रक्रियेवेळी माधव जाधव परळी शहरातील मतदान केंद्रास भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना ही मारहाण झाली.
परळी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत देखील बोगस मतदान होत असल्याचा आरोप उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला होता. याचा व्हिडिओ देखील माध्यमांसमोर आणण्यात आला. आता राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत फिरणाऱ्या या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचं समोर आलं आहे.