लोकशाही न्यूज नेटवर्क

शब्दान्वय प्रकाशन- मुंबई, तर्फे लेखक डॉ. भाऊसाहेब मिस्तरी यांची ‘रंधा’ या शिर्षकाची 223 पानांची सुंदर अशी कादंबरी प्रकाशित करुन मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही कादंबरी वाचकांना, लेखकांना, समीक्षकांना आवडत आहे तिचे कारण फक्त एकच दिसते. ते म्हणजे लेखकाचा लिहिताना असलेला प्रमाणिकपणा, निरागसपणे केलेली मांडणी. काही थोड्याफार उणिवा असतील पण वाचकांना रंधा आवडत आहे.
रंधा एक पण त्यात असलेली अनेक रुपं वाचकांच्या मनावर अधिराज्य करतात. घट्ट नातेसंबंध, संस्कार, परिश्रमातून मिळालेलं साफल्य, संघर्ष, कादंबरीचा आरंभ, मध्य. शिक्षण व जिद्द, लेखनात एखादा प्रसंग सांगतांना त्यातले सूक्ष्म बारकावे आणि लेखकासाठी रांगेत उभे राहणारे शब्द, बापाची तळमळ, आईची सहनशीलवृत्ती, आजोबांचा तत्कालीन निर्णय, कादंबरीत आलेलं ग्रामीण जीवन, तेथील माणसं पात्र प्रसंग, घटना, कार्यकारण भाव, बदलतं ग्रामजीवन, तेथील संस्कृती उत्सव, त्यानुसार आलेली आधुनिकता व बरचं काही. रंधाला ‘रंधा एक रुप अनेक’ असं म्हणायला भाग पाडतात.
कादंबरीची सुरुवात
‘सकाळचं कोवळं ऊन आता चांगलं तापायला लागलं होतं’. या ग्रामीण जीवनदर्शन घडविणाऱ्या वर्णनाने होते. गावातील घरे, तेथील कामामुळे असलेला एकंदरीत पसारा, गावातील होळी चौक, गल्ली, घरासमोरील अंगणात पडलेली सुताराच्या कामाची साधने, औजारे. काम पूर्ण करुन घेण्यासाठी जमलेले विविध शेतकरी बांधव असे वास्तव चित्रण वाचकांना खेड्यात घेऊन जातात.
नाती गोती, माया ममता कर्तव्य भावना, जबाबदारी
पुस्तकाचं मुखपृष्ठ खुप सुंदर असून बघणाऱ्या प्रत्येकाला आपल्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर घेऊन जातं. कर्तव्य व मनागटाच्या ताकदीवर विश्वास ठेवणारा ‘बाप माणूस’ वाल्मीक सुतार या माणसाच्या विविध पैलूंवरची चर्चा, वाचक कादंबरी वाचल्यावर करतो.
सुतारवाल्मिक अण्णाची तिसरी पत्नी कुसुम लेखकाची आई म्हणजेच ‘ताई’. कुसुमचा बाप म्हणजे लेखकाचे आजोबा. त्यांनी स्वतः आईविना होणारी बालकांची हेळसांड अनुभवली आहे. वाल्मिकच्या दोन निरागस मुलांची अबाळ होऊ नये म्हणून. आपली मुलगी देणारा बाप, स्वार्थी जगातला निस्वार्थी पणे माणूसकी जपणारा बाप वाचकांचं लक्ष वेधून घेतो.
रंधा कादंबरी वेगवेगळ्या टप्प्यातील वास्तव्य संघर्षाची कहाणी आहे. ‘समस्येतून मार्ग काढू अन यशाकडे जाऊ’ हा संदेश देत पुढे जाते. पारंपरिक व्यवसाय, चालीरीती सह परंपरांचा सन्मान व प्रसंगी बंडाची भूमिका कादंबरीचं आधुनिकपण सिद्ध करते. बालपणातील लेखकाची जाणिव कादंबरीची ऊर्जा म्हणून प्रत्ययास येते.
रंधा कादंबरीत येणारं गाव तेथील संस्कृती, निसर्ग, भावनिकता व इतर बाबी कादंबरीचा एक भाग होऊन एकजीव होतात. एकात अनेक रुप घेऊन मराठी साहित्यात आलेली ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी अशीच आहे..
महाराष्ट्रातल्या निसर्गात भंडाऱ्याजवळ प्रवरा नदी साधारणतः ५० मीटर खोल दरीत झेपावत त्या ठिकाणी ‘रंधा धबधबा’ म्हणून ओळखली जाते व निसर्ग प्रेमिंना आनंद देते. तशीच, खडबडीत, ओबडधोबड, लाकडाला सुताराचा ‘रंधा’ जसा गुळगुळीत बनवितो. तशीच वाल्मीक सुतार अण्णाच्या, शिस्त, प्रेम, निर्भयता व स्पष्टवक्तेपणा, मैत्री, संघर्ष व जिद्दीचा ‘रंधा’ डॉ. भाऊसाहेब मिस्तरींच्या लेखनाला बळ देत नवनिर्माणाची प्रेरणा देतो. प्रवरा नदीचं चैतन्यमय रुप असलेला ‘रंधा धबधबा’ व जीवनाची विविध रुपं असलेली कादंबरी ‘रंधा’ कादंबरी रसिकांना आनंद देत राहतील. हे मात्र खरे…

एकनाथ ल. गोफणे
चाळीसगाव
8275725423

