रामनवमीला अयोध्येत सूर्यकिरणांचा श्रीरामाच्या कपाळावर अभिषेक ; भक्तिमय आणि मंत्रमुग्ध करणारे दृश्य
अयोध्या (प्रतिनिधी): आज रामनवमीच्या पवित्र दिवशी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात एक अद्वितीय आणि दैवी घटना घडली. दुपारी अगदी बारा वाजता, प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या कपाळावर सूर्यकिरणांनी अभिषेक केला आणि उपस्थित भाविकांना एक अलौकिक आध्यात्मिक अनुभव मिळाला.
रामनवमी दिवशी बारा वाजताच सूर्य अगदी मंदिराच्या गाभाऱ्याच्या दिशेने असा किरण टाकतो की, त्याचे प्रतिबिंब थेट रामलल्लाच्या कपाळावर पडते. ही घटना नैसर्गिक खगोलीय संयोगामुळे घडते आणि वर्षातून फक्त एकदाच, रामनवमी दिवशी, अशी दृश्ये पाहायला मिळतात.
या दृष्याचे नियोजन मंदिराच्या बांधकामात अत्यंत बारकाईने करण्यात आले आहे. प्राचीन वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र आणि भक्तिभाव यांचा संगम म्हणजे अयोध्येतील हे दृश्य. मंदिराच्या रचनेत सूर्यप्रकाशाचा नेमका अभ्यास करून हे नियोजन करण्यात आले आहे.
रामनवमी निमित्त अयोध्येत भाविकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक अयोध्येत दाखल झाले होते. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या जन्मभूमीत उपस्थित राहण्यासाठी आणि त्या दिव्य क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.
गाभाऱ्यात ज्या क्षणी सूर्यकिरणांनी श्रीरामाच्या कपाळावर स्पर्श केला, त्याक्षणी मंत्रोच्चार, घंटानाद, आणि ‘जय श्रीराम’ च्या घोषांनी अयोध्या दुमदुमून गेली. काही भाविकांनी अश्रूंच्या धारा लावल्या, काहींनी दोन्ही हात जोडून हे दृश्य आपल्या अंतःकरणात साठवले.
आजचा दिवस रामजन्माचा म्हणजेच प्रभू श्रीरामांचा पृथ्वीवर आगमनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक विधी, पूजापाठ, कीर्तन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देशभरातून लोकांनी ‘साक्षात प्रभू श्रीरामांचे तेज’ म्हणून या दृश्याचे स्वागत केले आहे. अनेकांनी या क्षणाला ‘दैवी साक्षात्कार’ असेही म्हटले आहे.
अयोध्येतील मंदिराच्या बांधकामात सौर उर्जेच्या मार्गाचा अभ्यास करून खगोलशास्त्रीय सिद्धांतांचा वापर करण्यात आला आहे. अगदी कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, सूर्यकिरण मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचतील, हे लक्षात घेऊन मंदिराच्या दिशाशास्त्रानुसार उभारणी करण्यात आली आहे.

