जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सण, उत्सवाच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेले ध्वनी प्रदूषणाबाबतचे सर्व नियमांचे काटेकोरपने पालन करण्याचे आवाहन चाळीसगाव परिमंडळाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी केले.
धरणगाव पोलिस ठाण्याच्या आवारात आयोजित दुर्गा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले उपस्थित होते. यंदा तालुक्यात ११२ दुर्गा मंडळांची स्थापना झाली आहे. या मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच शहरात पार पडली. यावेळी बोलताना श्री. चोपडे म्हणाले, “की सण, उत्सव एकत्रितपणे सामंजस्याने साजरे करावेत”. कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशा प्रकारचे कार्य कोणाकडूनही होऊ नये.
जातीय सलोखा कायम राहावा, यासाठी सर्वांनी प्रयाण करणे गरजेचं आहे. दुर्गा उत्सवात सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेले ध्वनी प्रदूषणाबाबतचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश वजा सूचना देण्यात आल्या. तसेच वहन किंवा विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, पक्षाचा, अन्य कुणाचाही अवमान होईल, असे कोणतेच कृत्य करू नये.
त्याचप्रमाणे स्थापन केलेल्या दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. वाहन मिरवणूक किंवा विसर्जन मिरवणुकीत पोलिस विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे संबंधित लेझीम मंडळ तसेच विसर्जन मिरवणुकीतील भक्तांनी पालन करणे आवश्यक असल्याबाबत आदेश दिले.
यावेळी पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला तालुक्यातील दुर्गा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठक यशस्वितेसाठी गोपनीय विभागाचे मिलिंद सोनार, श्याम मोरे, वैभव बाविस्कर यांच्यासह पोलिस कर्मचारी, गृह रक्षक दलाचे पदाधिकारी प्रयत्नशील होते.