शिंदेंनी महाबंड करून आयटम बॉम्ब फोडला- रामदास आठवले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (Republican Party of India)  66 वा वर्धापन दिन सोहळा आज भुसावळ (Bhusawal) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) आज जळगाव (Jalgaon) जिल्हा दौऱ्यावर आहेत. याप्रसंगी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

शासकीय योजना पोहचवणे

यावेळी आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) कालखंडात अनेक विकास कामे होत आहेत. त्यांनी आणलेल्या अनेक योजनांचा लाभ जनता घेत आहे. काँग्रेसच्या काळापासून वाढलेली महागाई आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मध्यंतरी सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले होते. तसेच येत्या वेळेत देखील पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. देशातील तळागळातील व्यक्तीपर्यंत शासकीय योजना पोहचवणे हे आमच्या सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे.

शिंदेनी षटकार मारल्याने उद्धव ठाकरे पराभूत

राज्यात मोठा सत्तासंघर्ष झाल्याने आणि अनेक लोकं हे शिंदे गटात (Shinde Group) गेल्याने उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यात सामना होत एकनाथ शिंदे यांनी षटकार मारल्याने उद्धव ठाकरे हे पराभूत झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी कितीही टीका टिपणी केली तरी त्याला उत्तर देण्याचं सामर्थ शिंदेंमध्ये आहे. एकनाथ शिंदेनी महाबंड करून आयटम बॉम्ब फोडला आहे. ठाकरेंना त्यांचे आमदार टिकवता आले नाहीत. सर्वांत जास्त आमदार हे शिंदेंसोबत असून त्यांच्याकडे बहुमत असल्याने धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना मिळावे, याबाबत निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

आम्ही सक्षमपणे उभं आहोत

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार अतिशय गतिशील पद्धतीने सुरु आहे. या दोघांच्या नेतृत्वात अत्यंत चांगले निर्णय होत असल्याने जनता त्यांच्या पाठीमागे उभी आहे. येत्या निवडणुकीत नरेंद्र मोदी निवडून येतील आणि तेच देशाचे पंतप्रधान होतील, तसेच महाराष्ट्र्रात देखील भाजपचं सरकार येईल, अशी अपेक्षा आहे. येणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजप आणि शिंदे गटासोबत आहे. येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष अत्यंत ताकदीने या महायुतीच्या सोबत आहे. रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा मिळावा, मंत्रिपद मिळावे, अनेक आमदारही मिळावे याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली आहे. याविषयी विचार करणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं आहे. तसेच शिंदे – फडणवीस सरकार आम्ही कोसळू देणार नाही. आम्ही सक्षमपणे उभं आहोत. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत, परंतु एकही आमदार शिंदेंना सोडून जाणार नाही. असा विश्वास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

त्यांना ते जमलं नाही

तसेच आठवले म्हणाले की, अजित पवारांना (Ajit Pawar) पहाटेच्या शपथविधीची सवय आहे. पण त्यांना ते जमलं नाही. हेच एकनाथ शिंदेनी करून दाखवलं. अजित दादा इकडे येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांना वाटत असेल की, शिंदे- फडणवीस सरकार पडेल आणि त्यांचं सरकार येईल असं काही होणार नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.