मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भातील घोषणा केली. राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार असून त्यांनी अनेक पुतळ्यांची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रातील या सुपुत्राचा महाराष्ट्र भूषण या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
राम सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. 1955 मध्ये ते दिल्लीला गेले आणि माहिती प्रसारण मंत्रालयाचा भाग बनले. राम सुतार यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. वडील सुतार होते. कठीण परिस्थितीतही राम हे अभ्यासात अव्वल राहिले. राम यांनी लहानपणापासूनच चित्रकला सुरू केली. त्यांचे गुरू रामकृष्ण जोशी यांना त्यांच्यात क्षमता दिसली.
आपल्या गुरुंच्या सल्ल्यानुसार राम सुतार यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. जेजे स्कूलमध्येच शिल्पकलेकडील माझा कल वाढल्याचे ते सांगतात. महाराष्ट्र सरकार त्यांना सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.