Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकशाही विशेष»रक्षाबंधन आणि बहिणींची सुरक्षा!
    लोकशाही विशेष

    रक्षाबंधन आणि बहिणींची सुरक्षा!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 26, 2026No Comments71 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही विशेष लेख

    रक्षाबंधन सण अगदी तोंडावर आल्याने बाजारपेठा विविध रंगांच्या राख्यांनी सजल्या आहेत. हिंदू संस्कृतीत भाऊ-बहिणीचे नाते हे अत्यंत पवित्र मानले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटाला राखी बांधून त्याच्याकडून तिच्या रक्षणाचे वचन घेते. भाऊसुद्धा ‘प्राणपणाने तुझे रक्षण करेल,’ असे बहिणीला वचन देतो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करते, तर भाऊसुद्धा बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखसंपन्नतेसाठी आणि संरक्षणासाठी देवाकडे याचना करतो.

    सहस्रो वर्षांची परंपरा लाभलेल्या या सणाला भाऊ-बहिणीतील अतुल प्रेमाची, आदराची आणि निष्ठेची जोड आहे. द्वापारयुगात एकदा भगवान श्रीकृष्णाच्या मनगटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहू लागले. हे पाहताच द्रौपदीने क्षणाचाही विलंब न करता नेसलेल्या भरजरी वस्त्राच्या टोकाचा एक तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या मनगटाला बांधला. तेव्हापासून बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा हा उत्सव साजरा केला जाऊ लागला.

    रक्षाबंधनाच्या दिवशी सूर्योदयी स्नान करतात. उपकर्म करून ऋषींचे तर्पण करतात. अपराह्नकाळी राखी तयार करतात. तांदूळ, सोने आणि पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी तयार केली जाते, जिला राखी म्हटले जाते. या राखीचे पूजन केले जाते. त्यानंतर ‘येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल॥’ हा मंत्र म्हणून बहीण भावाला ही राखी बांधते. ‘महाबली दानवेंद्र बळी राजा जिच्यामुळे बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे रक्षे, तू चलित होऊ नकोस,’ असा या मंत्राचा अर्थ आहे.

    कालागणिक हा सण साजरा करण्याची पद्धत जरी बदलली असली, तरी सणामागील उद्देश मात्र तोच आहे. आज आपला भाऊ सातासमुद्रापार जरी असला, तरी बहीण त्याला राखी पाठवायला विसरत नाही. ज्या बहिणींना सख्खा भाऊ नसतो, ती अन्य पुरुषाला किंवा चंद्राला आपला भाऊ मानते आणि हा सण साजरा करते.

    ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः।’ अर्थात, ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा, म्हणजेच तिचा मान-सन्मान होतो, त्या कुळात सुशील आणि गुणसंपन्न संतती जन्माला येते. ज्या ठिकाणी स्त्रीचा अपमान होतो, त्या कुळाची प्रगती खुंटते. हा संस्कार हिंदू धर्मग्रंथांनी केल्यामुळे हिंदू धर्मात स्त्रीला नेहमीच आदराचे आणि सन्मानाचे स्थान दिले गेले आहे.

    रक्षाबंधन हा सणसुद्धा स्त्रीप्रती आदर व्यक्त करणाराच आहे. आठशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वबंधुत्वाची शिकवण दिली आहे. लहानपणी शाळेतसुद्धा ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत,’ अशी प्रतिज्ञा करूनच प्रत्येक जण मोठा झाला आहे. दुर्दैवाने या सर्वांचा आजच्या तरुण वर्गाला विसर पडला आहे. आजमितीला देशासह राज्यातील स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. दोन वर्षांच्या बालिकेपासून ८० वर्षांच्या वृद्धेपर्यंत कोणीही नराधमांच्या वासनेतून सुटत नाही. आपल्या बहिणीला रक्षणाचे वचन देणारा भाऊ अन्य स्त्रीमध्ये आपल्या भगिनीचे रूप का पाहू शकत नाही? आपल्या संस्कृतीचा आपल्यालाच विसर पडू लागला आहे का?

    छत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या पिढीचे दैवत आहेत. आजचा तरुण एकवेळ आई-वडिलांचा अपमान सहन करेल; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढणाऱ्याची जीभ छाटल्याशिवाय राहणार नाही. आज मंदिरातील देवांच्या मूर्ती शाबूत आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच. पाच बलाढ्य पातशाह्यांविरोधात लढून महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रयतेला भयमुक्त केले. व्यापाराचे निमित्त करून सत्ताकारणात ढवळाढवळ करू पाहणाऱ्या इंग्रजांना त्यांची जागा दाखवून दिली.

    आपल्या अधिकाराचा गैरवापर करून महिलेवर अत्याचार करणाऱ्या रांझे पाटलाचा चौरंगा करून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श स्वराज्यासमोर निर्माण केला. स्वराज्यातील स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याची काय स्थिती होऊ शकते, याचे उदाहरण त्यांनी जगासमोर उभे केले. त्यानंतर कोणाची हिंमत झाली नाही स्वराज्यातील स्त्रियांकडे वासनेच्या नजरेने पाहण्याची.

    शिवाजी महाराजांना देव मानणारा आजचा तरुण लुटीच्या मुद्देमालासह आलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने स्वगृही पाठवणाऱ्या शिवाजी महाराजांची वृत्ती अंगी केव्हा बाणवणार आहे? स्वराज्यातील बायाबापड्यांच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण धोक्यात घालणाऱ्या संभाजी महाराजांचा आदर्श आजचा तरुण कधी अंगीकारणार आहे?

    ‘जो देश आपल्या इतिहासातून धडे घेत नाही, तो देश रसातळाला जातो,’ अशी एक म्हण आहे. आजच्या तरुणांची स्थितीही काहीशी अशीच झाली आहे. आज तरुणांना गरज आहे इतिहासातील थोर पुरुषांच्या चरित्रातून धडे घेऊन आपले चारित्र्य घडवायची.

    आजचे सरकार राज्यातील भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये देत आहे; मात्र बहिणींना केवळ आर्थिक साहाय्य करणे एवढेच भावाचे कर्तव्य नसून, बहिणीच्या रक्षणाची सर्वस्वी जबाबदारी घेणे हे भावाचे प्रमुख दायित्व आहे. राज्याची परिस्थिती पाहता राज्यातील भगिनींना आर्थिक मदतीपेक्षा सुरक्षिततेचीच अधिक आवश्यकता आहे.

    छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील महिलेवर अत्याचार करणाऱ्या रांझे पाटलाचे हात-पाय कलम करून वासनांधांवर अंकुश निर्माण केला होता. महाराष्ट्रातही अशा कठोर कायद्याची आज नितांत गरज आहे. स्त्री-अत्याचाराच्या विरोधात ज्यावेळी कठोर कायदे अमलात येऊन त्यांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली जाईल, ज्या दिवशी स्त्री-अत्याचाराचा आलेख घसरू लागेल आणि ज्या दिवशी एका स्त्रीच्या रक्षणासाठी हजारो मनगटे पुढे सरसावतील, त्या दिवशी रक्षाबंधनाचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य झाला, असे म्हणता येईल.

    जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
    संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा

    September 9, 2026

    डिजिटल क्रांती : समृद्ध शेतीचा पाया/ ‘स्मार्ट शेती, भरघोस प्रगती’

    September 8, 2026

    दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?

    September 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif