जळगाव : महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. शहराच्या राजकारणात सध्या निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचला असून प्रत्येक प्रभागात उमेदवार, कार्यकर्ते आणि नेत्यांची धावपळ सुरू आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या भेटीगाठी, प्रचारफेऱ्या, बैठका आणि कोपरा सभा यामुळे शहरातील वातावरण पूर्णपणे राजकीय झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला पोषक असे वातावरण तयार झालेले दिसत आहे. दुसरीकडे विरोधी गटात मात्र संभ्रम, नाराजी आणि अंतर्गत मतभेदांची छाया स्पष्टपणे जाणवत आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे प्रमुख म्हणून आमदार राजूमामा भोळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी त्यांनी केवळ स्वीकारली नाही, तर ती समर्थपणे पेलत असल्याचे चित्र सध्या शहरभर दिसून येत आहे. गेल्या तीन पंचवार्षिकपासून ते जळगाव शहराचे आमदार म्हणून कार्यरत असून, या काळात त्यांनी जो व्यापक जनसंपर्क निर्माण केला आहे, त्याचा थेट फायदा महायुतीला होत आहे. राजूमामा भोळे हे नाव केवळ राजकीय नाही, तर अनेक मतदारांसाठी आपुलकीचे समीकरण बनले आहे.
‘गुड मॉर्निंग’पासून ते ‘गुड नाईट’पर्यंत प्रचारात सक्रिय असलेले राजूमामा भोळे हे सध्या संपूर्ण प्रचारयंत्रणेचे केंद्रबिंदू ठरले आहेत. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध प्रभागांत त्यांचा दौरा सुरू असतो. छोट्या गल्ल्यांपासून ते मोठ्या वसाहतींपर्यंत, व्यापारी संकुलांपासून ते झोपडपट्ट्यांपर्यंत ते स्वतः पोहोचत आहेत. प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असून, मतदारांशी थेट संवाद साधण्यावर त्यांचा भर आहे.
विशेष म्हणजे या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी नागरिक स्वतःहून राजूमामा भोळे यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, विकासकामे याबाबत मोकळेपणाने चर्चा होत असून, आमदार म्हणून त्यांच्या कामकाजाची आठवण नागरिक करून देत आहेत. हा विश्वासच महायुतीसाठी मोठी ताकद ठरत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.