लोकशाही संपादकीय लेख
ऐन दिवाळीच्या सणात चाळीसगावचे माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. चाळीसगाव शहराचे माजी नगराध्यक्ष अनिलदादा देशमुख यांच्या निधनानंतरही चाळीसगाव शहर वासियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या समाजकार्यामुळे कै. अनिलदादा देशमुख हवेहवेसे वाटायचे. राजकारणात असूनही ते अजातशत्रू होते. त्यांचे देशमुख घराणे खानदानी घराणे म्हणून ओळखले जाते. त्यांचाच वारसा चालविणारे माजी आमदार राजीव देशमुख सुद्धा पक्षीय राजकारणात असले तरी चाळीसगाव शहरवासीयांना ते हवेहवेसे वाटायचे. राजीव देशमुख यांच्या जाण्याने चाळीसगाव शहरावर दुःखाची कळा पसरली आहे. विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे जरी भाजपचे असले आणि राजकीय निवडणुकीत जरी ते एकमेकांच्या विरुद्ध लढले असले, तरी राजकारणापलीकडचे त्यांचे मैत्रीचे संबंध होते, असे खुद्द आमदार मंगेश चव्हाण यांनी मान्य केले आहे. त्यामुळे राजकारणापलीकडे माणूस म्हणून राजीव देशमुख यांचे एक वेगळे स्थान होते. चाळीसगाव शहर आणि तालुक्याचे राजकारण देशमुखांच्या राजगड बंगल्यावरून चालायचे. कै. अनिलदादा देशमुख हे खऱ्याखुऱ्या अर्थाने ‘दादा’ होते. ते चाळीसगाव शहर व तालुक्याच्या राजकारणाचे किंग मेकर होते. त्यांचा एक दरारा वेगळाच होता. सर्वसामान्यांचे ते मसीहा होते. शहरात त्यांच्या नावाचा दबदबा होता. स्वतःला भलेभले गुंड समजणारे गुंड सुद्धा त्यांना घाबरायचे. एक आदरयुक्त भीती त्यांच्याविषयी होती. त्यांचाच वारसा चालविणाऱ्या राजीव देशमुख यांनी सुद्धा दर्जेदार राजकारण केले. आताच्या परिस्थितीत राज्यातील राजकारणात जी बजबजपुरी निर्माण झाली आहे, त्या बजबजपुरीमध्ये कधीच ते वाहून गेले नाहीत. म्हणूनच 2014 च्या आणि 2019 च्या निवडणुकीत झालेल्या पराभवात ते घाणेरड्या राजकारणाचे बळी ठरले. 2009 ते 2014 या कालावधीत आमदार असताना त्यांचे मंत्रिपद थोडक्यात हुकले. मंत्री पदाची माळ त्यांचे गळ्यात पडताना पडता राहिली. तरीही मंत्रिपद नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा चाळीसगाव मतदार संघात त्यांनी विकासाची अनेक कामे केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विशेषतः पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे त्यांना मानाचे स्थान होते. असा उमदा नेता चाळीसगावकरांना तसेच चाळीसगाव तालुका वासियांना हवाहवासा असताना त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने चाळीसगाव तालुक्यात पोकळी निर्माण झाली आहे. कै. राजीव देशमुख यांना चाळीसगाव शहर, तालुका तसेच जिल्ह्यातर्फे आदरांजली..!