जागा अडकवुन बसणाऱ्या कार्यकर्त्यांना मनसेत स्थान नसणार – राज ठाकरे

0

 

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मी राज ठाकरेच्या जवळचा व्यक्ती आहे त्यामुळे पदावर कायम राहील. हे डोक्यातून काढून टाका !  मनसे साठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच यापुढे जागा मिळेल. जे योग्य असतील त्यांनाच यापुढे पदावर ठेवू. पुढे पुढे करणारे व जागा अडकवून बसणाऱ्यांना यापुढे मनसेत स्थान नसणार! त्यामुळे विभाग व जिल्हा स्तरावर संघटनात्मक बदल करण्यात येतील असे संकेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विभागीय मेळाव्यात दिले.

अमरावती शहरात मनसेचा विभागीय मेळावा 21 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला व्यासपीठावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, प्रवक्ते प्रकाश महाजन, संदीप देशपांडे, राजू उंबरकर, अविनाश जाधव, विठ्ठल लोखंडकार, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे आदी उपस्थित होते.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की जिल्हास्तरावर समस्यांचा ढिग आहे. अशातच काही पदाधिकारी अधिकाऱ्यांची चापलुशी करतात. अशा पदाधिकाऱ्यांना आता संघटनेत थारा नाही. असे यादरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्थ करीत सांगितले. ज्याप्रकारे जिल्ह्यात मला संघटना हवी आहे, त्या प्रकारची संघटना तुम्ही मला द्या! नवनिर्माण याचा अर्थ महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा महाराष्ट्र मनसेने घडवावा असा आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याच प्रकारे काम केले पाहिजे. अनुशासन आणि निरंतरता ठेवून नागरिकांच्या समस्या सोडविल्या पाहिजे. मनसेचा कार्यकर्ता म्हणून अभिमानाने घरी जाता आलं पाहिजे. नागरिकांनाही मनसेच्या कार्यकर्त्याचे नाव घेतल्यावर अभिमान वाटावा असे काम करा. यापुढे मनसेचे पद हे केवळ एक वर्षाकरीता दिले जाईल. एका वर्षात जर पदाधिकाऱ्यांची कामे समाधानकारक वाटली नाही तर ते पद काढून टाकण्यात येईल. हा बदल विभागीय जिल्हा व शहर स्तरावर करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

पैशाला नाही । कामांना महत्व द्या

प्रत्येक गोष्टीत पैसा लागतोच असे नाही. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या निफ्टविण्याचा प्रयत्न करा. नागरिक स्वतःहून तुमच्याकडे येतील. प्रत्येक गोष्टीसाठी पैसाच लागत नाही. शासनाच्या योजना जर त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या गेल्या तर निश्चितच नागरिक स्वतःहून तुमच्याकडे येतील. कार्यकर्त्यांकरिता लवकरच कार्यशाळेचे आयोजनही करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले.

पक्ष वाढीसाठी आम्ही कमी पडलो

मनसे जिल्हाध्यक्ष मंगेश उर्फ पप्पू पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले की एका पत्रकाराने राज ठाकरेंना प्रश्न विचारला तुमची मनसे विदर्भात का वाढत  नाही! याकरिता वरिष्ठ कमी पडत आहेत का? यावर उत्तर देतांना राज ठाकरेंनी माफी मागत आपण कमी पडलो असल्याचे सांगितले. ज्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांकडे आदर आहे त्या व्यक्तीने आपल्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालून स्वतः माफी मागितली. वास्तवात पक्ष वाढीसाठी आम्हीच कमी पडलो आहे. निवडणूक लढवायला जनाधार असावा लागतो पैसा नाही .कुणीही जर इमाने- इतबारे काम करेल त्यांच्या सोबतच आम्ही तन-मन-धनाने राहू असेही पप्पू पाटील यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.