उद्धव आजारी पडला, तेव्हा गाडी घेऊन पहिला मी गेलो !
अमितसाठी भीक मागणार नाही : राज ठाकरेंचे सडेतोड वक्तव्य
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासाठी धडाडली. प्रभादेवीत घेतलेल्या प्रचारसभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंपासून सदा सरवणकर यांच्यापर्यंत अनेकांवर टीकेची झोड उठवली. अमित निवडणुकीला उभा राहत असताना मी भिका नाही मागणार, असे त्यांनी निक्षून सांगितले, तर जे कोणाचेच झाले नाहीत त्यांच्यावर काय बोलणार, असे म्हणत सदा सरवणकरांनाही टोले लगावले. ज्यावेळी उद्धव आजारी पडला, त्यावेळी पहिला गाडी घेऊन मी गेलो होतो तिथे, मी अलिबागला होतो, मला बाळासाहेबांचा फोन आला, अरे तुला कळले का, असे झाले, म्हटले हो निघालोय मी, मी परिवाराच्या आड कधी राजकारण येऊ दिले नाही, असे राज ठाकरे सांगत होते.
वरळीला जेव्हा आदित्य उभा होता गेल्या वेळेला, 37-38 हजार मते आहेत तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, पण म्हटले आमच्या कुटुंबातला पहिला माणूस उभा राहतोय, मी तिथे उमेदवार टाकणार नाही, ही माझ्या मनातून आलेली गोष्ट होती, मी कुणाला फोन नाही केला, की मी टाकत नाहीये, पुढच्या वेळेला मला सांभाळून घ्या, असल्या फालतू भिका मी नाही मागत. माझ्याकडून चांगुलपणाच्या जेव्हा गोष्टी होतील तेवढ्या मी केल्या. आज अमित उभा राहत असताना देखील मी भिका नाही मागणार, असे राज ठाकरे म्हणाले.
सरवणकरांवर निशाणा
जो कोणाचाच नाही झाला, त्याच्यावर काय बोलायचे ? बाळासाहेब हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमधून आमदारकीला उभी राहिली आणि पडली. पडल्यावर परत शिवसेनेत आले आणि आमदार झाले. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पेट्रोल पंपावर बसून शिंदेंना शिव्या दिल्या आणि त्यांनाच जाऊन नंतर सामील झाले, आपले आहेत की नाहीत यावर विश्वास ठेवता येत नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी सदा सरवणकर यांनाही चिमटे काढले.