लोकशाही न्यूज नेटवर्क
त्रिभाषा सुत्रावरून राज्यातील मराठीवर्ग पेटून उठला आहे. शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आल्यानंतर सरकारने घातलेला घाट उधळून लावण्याचा विडा ठाकरे बंधूंनी उचलला आहे. मराठी अस्मितेसाठी ५ जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. खासदार संजय राऊतांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली. दरम्यान, हे ठरलं केव्हा? यासंदर्भातील माहिती आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांनी दिली.
कालच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी मोर्चा आणि उद्धव ठाकरेंनी आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान, ठाकरे बंधू आज एकत्र मोर्चासाठी मैदानात उतरणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं. ‘राज ठाकरेंनी मला फोन केला होता. मराठी भाषेसाठी २ मोर्चे निघणं योग्य नाही, यासाठी एकच मोर्चा निघायला हवा, असं राज ठाकरे म्हणाले. यानंतर उद्धव ठाकरेंना माहिती दिली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा आढेवेढे न घेता यासाठी सहमती दर्शवली. मराठी ऐक्य दिसायला हवं, असं उद्धव ठाकरे म्हणाले’, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
‘राज ठाकरेंनी ६ जुलैला मोर्चा काढू असं सांगितलं. त्यांनतर मी त्यांना पुन्हा फोन केला. ६ तारखेला आषाढी एकादशी असल्याचं सांगितलं. त्यामुळे राज ठाकरेंनी ५ जुलै ही तारीख ठरवली’, अशी माहिती राऊतांनी दिली. ‘येत्या ५ जुलैला मोर्चा निघेल, सकाळी १० ही योग्य वेळ नाही. यासंदर्भात आम्ही चर्चा करू, वेळेच्या बाबतीत आणि ठिकाणाचीही चर्चा करू, असं आम्ही ठरवलंय’, असं संजय राऊत म्हणाले.
हिंदी भाषा सक्तीविरोधातील मुद्दा पेटल्यानंतर ठाकरे बंधूंनी मोर्चा काढण्याची घोषणा केली. ५ जुलैला पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत या मोर्चाबाबत माहिती दिली. तसेच ठाकरे बंधू मनाने एकत्र असल्याचं सांगितलं. ‘उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मनात आहे ते मी करेन, असं सांगितलं. कालच्या बैठकीत त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली. ५ जुलैला एकत्र मोर्चा काढणार, ठाकरे बंधू मनाने एकत्रच आहेत’, असं सूचक विधान संजय राऊतांनी केले.