जळगाव जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा, भडगाव आणि एरंडोल तालुक्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान तज्ज्ञ नीलेश गोरे यांच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते पश्चिमेकडे सरकले आहे. त्यामुळे २४ सप्टेंबरपासून जळगाव जिल्ह्यात नवीन पावसाची प्रणाली सक्रिय होणार आहे. या प्रणालीच्या परिणामस्वरूप २५ ते २८ सप्टेंबर या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः नदीकाठच्या गावांतील रहिवाशांनी खबरदारी घ्यावी, आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.


