लोकशाही विशेष
भारतीय रेल्वे ही देशातील दळणवळणाचे सर्वात मोठे आणि महत्वाचे साधन आहे. दररोज लाखो व्यक्ती रेल्वेने प्रवास करत असतात आणि देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जात असतात. भारतीय रेल्वेने मागील काही वर्षामध्ये स्वत:ला अपग्रेड केले असून अनेक ट्रेन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर कापतात. भारतीय रेल्वेमध्ये सध्या सर्वात प्रसिद्ध असणारी ट्रेन म्हणजे ‘वंदे भारत’. काही वर्षांपूर्वी रेल्वे विभागाने ही ट्रेन प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे रुळांवर उतरवली होती. वंदे भारत ही सेमी हाईस्पीड ट्रेन असून यात प्रवाशांसाठी अनेक आधुनिक सुविधा आहेत.
ट्रेनच्या मागे का असते ‘X’ हे निशाण ?
ट्रेनच्या शेवटच्या डब्या मागे असणारे ‘X’ हे चिन्ह ट्रेनच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचे असते. कोणत्याही मार्गावर धावणाऱ्या ट्रेनला अपघातांपासून वाचवण्यासाठी याचा उपयोग होतो. प्रत्येक ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ही खूण यासाठी केली जाते की जेणेकरून स्टेशनवर उपस्थित असलेल्या प्रवाशांना ट्रेन निघून गेल्याचे समजू शकेल. तसेच जर ही खूण शेवटच्या डब्यावर दिसली नाही तर हा रेल्वे अधिकाऱ्यांसाठी एका प्रकारे अलर्ट असतो की ट्रेनच्या मागील काही डबे ट्रेनपासून वेगळे झाले आहेत. यानंतर रेल्वे त्यांच्या आपात्कालीन कारवाईला सुरुवात करते. ‘X’ हे निशाण अधिकतर पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाने बनवले जाते.
वंदे भारत ट्रेनच्या मागे नसते ‘X’
तुम्ही भारतातील कोणत्याही पॅसेंजर ट्रेनच्या सर्वात शेवटच्या डब्यावर पाहिलंत तर त्यावर ‘X’ चे निशाण असते. हे निशाण एक प्रकारे भारतीय रेल्वेची ओळख आहे. परंतु तुम्ही पाहिले असेल की वंदे भारत ट्रेनच्या मागे हे निशाण नसते. यामागचे कारण वंदे भारत एक्सप्रेस ही सर्व प्रकारच्या सुरक्षा यंत्रणांनी सुसज्ज आहे. वंदे भारत ट्रेन पूर्णपणे जोडलेली असते आणि ती दोन्ही दिशांना चालवता येते. त्यामुळे त्यात शेवटच्या डब्यावर असे कोणतेही चिन्ह तयार केले जात नाही.