मुंबई-छपरादरम्यान चार विशेष रेल्वेगाड्या
प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय
भुसावळ प्रतिनिधी प्रवाशांची वाढलेली गर्दी आणि तिकिटांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), मुंबई आणि छपरा (Chhapra) दरम्यान चार विशेष रेल्वेसेवा चालविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातून उत्तर भारताकडे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या विशेष गाड्यांचे वेळापत्रक मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.
गाडी क्रमांक ०५५८८ ही गाडी ९ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दुपारी ३.५५ वाजता सुटेल आणि छपरा येथे तिसऱ्या दिवशी दुपारी १.४५ वाजता पोहोचेल. तर छपरा येथून ७ नोव्हेंबर रोजी रात्री १०.४५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक ०५५८७ ही तिसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. याशिवाय, १० नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दुपारी ३.५५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक ०५५९० ही छपरा येथे तिसऱ्या दिवशी १.४५ वाजता पोहोचेल.
तसेच, ८ नोव्हेंबर रोजी छपरा येथून रात्री १०.४५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक ०५५८९ ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता पोहोचेल. या विशेष रेल्वेगाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई (झाशी), उरई, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, बादशाहनगर, गोमतीनगर, बाराबंकी, गोंडा, बस्ती, गोरखपूर, देवरिया सदर आणि सिवान या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.