एरंडोल: पत्त्याच्या क्लबवर IG पथकाची धाड !8 जण ताब्यात 

1 लाखाच्या रोकडसह साहित्य जप्त, पोलिसांच्या कारवाईवर आश्‍चर्य व्यक्त

0

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क 

एरंडोल शहरात मोठ्या प्रमाणावर पत्त्यांचे क्लब आणि सट्टा पेढी बिनधास्तपणे सुरू असताना एका क्लब वर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईबद्दल आश्‍चर्य

येथील हॉटेल मयूरी गार्डनजवळ सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून सुमारे एक लाख ३१ हजार १४० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. मात्र आता कारवाईबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

आठ जण ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल मयूरी गार्डनजवळ पत्त्याचा क्लब सुरू असल्याची गुप्त माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला मिळाली. या माहितीनुसार उपनिरीक्षक तथा पथकप्रमुख अरुण भिसे, हवालदार प्रमोद मंडलिक, सुरेश टोंगारे, विजय बिलघे, तुषार पाटील, विक्रांत मांगडे, स्वप्नील माळी यांनी पारोळ्याचे पोलिस निरीक्षक सुनील पवार, हवालदार हिरालाल पाटील, अभिजित पाटील, अनिल राठोड, आकाश माळी यांच्या मदतीने रविवारी (ता. ८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास क्लबवर धाड टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. तर काही जण भिंतीवरून उड्या मारून पसार झाले.

रोकड जप्त

यावेळी एक लाख ३१ हजार १४० रुपयांची रोकड, मोबाईल व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी हवालदार प्रमोद मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्लब चालक नितीन चौधरी, विकास महाजन, चंद्रकांत वाघ, गणेश चौधरी, दीपक लोहिरे, धनराज पाटील, संदीप जाधव, सतीश चौधरी, चंदन जैस्वाल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांवर केला आरोप

दरम्यान पोलिसांनी सुमारे १५ ते २० लाखांची रोकड बोलेरो गाडीतून गायब केल्याचा आरोप क्लब चालकांनी केला. आमच्याविरोधात कारवाई करा. मात्र, जप्त केलेल्या सर्व रोख रकमेचा पंचनाम्यात उल्लेख करा, तसेच शहरात सात ते आठ ठिकाणी पत्ते व सट्ट्याची पिढी सुरू असताना, केवळ आमच्याच क्लबवर कारवाई का केली, क्लब चालविण्यासाठी कोणाला किती रक्कम दिली जाते, याची माहिती देत संशयितांनी पोलिसांवर आरोप केले आहेत.

यावेळी क्लबवर छापा पडताच जमाव जमा झाला होता. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, सहाय्यक निरीक्षक शंकर पवार, उपनिरीक्षक शरद बागल, विकास देशमुख, विलास पाटील, काशीनाथ पाटील, संतोष चौधरी, दीपक पाटील, दीपक अहिरे, पंकज पाटील यांनी जमावाला पांगविले.

Leave A Reply

Your email address will not be published.