लोकशाही संपादकीय लेख
अलीकडे रस्ते, रेल्वे तसेच हवाई अपघाताचे प्रमाण वाढले आहे. देशात महामार्गाच्या माध्यमातून रस्त्यांचे मोठे जाळे विणले जात असले तरी अपघातांची संख्या काही केल्या कमी होत नाही. रेल्वे मार्गावर केव्हा, कसा विचित्र पद्धतीने अपघात होईल हे सांगता येत नाही. काल दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान लखनऊ येथून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक रेल्वे एक्सप्रेसचा पाचोरा रेल्वे स्टेशनच्या अलीकडे सुमारे दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या परधाडे रेल्वे स्टेशन जवळ अचानक जोरात ब्रेक मारल्याने ठिणग्या उडाल्या. यातून धूर निघाला. त्यामुळे पुष्पक मधील रेल्वे प्रवाशांमध्ये आग लागल्याची भीती पसरली आणि चालत्या रेल्वेतून तीस ते पस्तीस प्रवाशांनी डब्यातून खाली उड्या मारल्या. त्याच वेळी बंगळूरहून दिल्लीकडे जोरात जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने ट्रॅकवर उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडले. त्यामध्ये माहिती मिळेपर्यंत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १५ ते २० प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
दुर्घटना स्थळी रेल्वेचे प्रशासकीय तसेच रेल्वे पोलीस पोहोचले होते. पुष्पक एक्सप्रेस पाचोरा रेल्वे स्टेशनवर थांबवून त्यांची अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. माजी खासदार उन्मेष पाटील यांचे म्हणणे आहे, की रेल्वे पटरीवर काम चालू असल्याने पुष्पक रेल्वे जंगलात थांबली होती. दरम्यान काही प्रवासी गाडीतून उतरून डाऊन ट्रॅकवर पटरीवर उभे होते. त्याचवेळी बंगळूरहुन कर्नाटक एक्सप्रेस आली. कर्नाटक एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने हॉर्न द्यायला हवा होता, परंतु तो दिला नाही. त्यामुळे पटरीवर उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि १५ ते २० प्रवासी जखमी झाले. उन्मेष पाटलांचे कार्यकर्ते तेथे होते. त्यांनी ही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नेमके कशामुळे दुर्घटना झाली? त्याचे कारण कळले पाहिजे.
आगीच्या भीतीने पुष्पक मधील प्रवाशांनी उड्या मारल्या की पुष्पक एक्सप्रेस थांबल्यामुळे प्रवासी डब्यातून उतरून डाऊन ट्रॅक वर गेले होते? नेमके कारण काय? याचा रेल्वे अधिकाऱ्यांकडून तातडीने खुलासा करण्याची गरज आहे. नाहक बिचाऱ्या प्रवाशांवर बेतले. त्याला जबाबदार कोण? त्यासाठी या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे. मृत्युमुखी पडलेले प्रवासी कुठले आहे? त्यांची ओळख पटवून त्यांची माहिती त्यांच्या नातेवाईकांपर्यंत कळविणे आवश्यक आहे. जखमी प्रवाशांना विचारून त्याची माहिती तातडीने मिळू शकते. ती माहिती सुद्धा त्यांच्या मूळ गावी नातेवाईकांना कळविणे आवश्यक आहे.
पुष्पक रेल्वे एक्सप्रेसमध्ये चैन ओढल्याने ब्रेक लागून आगीच्या ठिणग्या उडाल्या. आगीच्या भीतीने प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या, हे आपण समजू शकतो परंतु रेल्वे जंगलात थांबली असताना डब्यातील प्रवाशांना खाली उतरण्याची आवश्यकता नव्हती. तसे झाले असेल तर प्रवाशांचा सुद्धा आतताईपणा म्हणावा लागेल. जंगलात रेल्वे डब्यातून खाली उतरण्याची आवश्यकता नव्हती. रेल्वे स्टेशनवर गाडी थांबली, तर प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरून काही वस्तू वगैरे खरेदी करू शकतात. परंतु जंगलात गाडी थांबली असताना डब्यातून खाली उतरण्याचे कारणच नव्हते. त्यांचे खाली उतरणे हे त्यांच्या जीवावर बेतले. बरे या दोन्ही गाड्या सुपरफास्ट एक्सप्रेस असल्याने पुष्पक किंवा कर्नाटक एक्सप्रेसच्या पाचोर्याला थांबा नसल्यामुळे दोन्ही गाड्या वेगातच राहणार, हे निश्चित होते. त्यामुळे अलीकडे रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गावरील अपघात कसा आणि कोणत्या परिस्थितीत होईल हे सांगता येत नाही.
वाहतुकीच्या जेवढ्या चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे अपघातविरहित प्रवास व्हावा ही अपेक्षा आहे. परंतु चांगल्या सुविधा दिल्यानंतर अपघाताचे प्रमाण कमी होत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यामुळे या रेल्वे दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून त्याचे नेमके कारण काय? याची अधिकृत माहिती काढली पाहिजे. तसेच या अपघाताला जर रेल्वेच्या चालकांचा दोष असेल तर त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. अधिकृत दुर्घटनेची माहिती जाहीर झाली तर प्रवाशांच्या मनात रेल्वे प्रवासाविषयी असुरक्षितता राहणार नाही. दुपारी चारच्या सुमारास झालेल्या या रेल्वे दुर्घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे देशभरात पसरले. देशाच्या कानाकोपऱ्यातून माध्यम प्रतिनिधींचे फोन खणखणीत होते. “जळगाव पाचोरादरम्यान पुष्पक एक्सप्रेस डब्याला आग लागल्याने प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या आणि नेमके त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांना चिरडले..”, “किती जखमी झाले?”. “किती मृत्यू झाले?” वगैरे.. वगैरे.. बातम्या झळकत होत्या. त्यासाठी तातडीने रेल्वे खात्याने अधिकृत माहिती जाहीर करावी..!