जळगावच्या पुष्करची मराठी चित्रपटात ‘पुष्पक’ भरारी
पुष्कर यावलकर निर्मित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला : महाराष्ट्रभरात लागणार शो
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील 25 वर्षीय तरुण पुष्कर यावलकर याने बहुचर्चित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपट निर्मित केला असून लवकरच हा चित्रपट महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना भेटण्यास येणार आहे.
अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ बहुचर्चित मनोरंजनाने भरपूर कुरळे ब्रदर्सची धमाल असलेला विनोदी आणि सामाजिक संदेश देणारा चित्रपट लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांच्यासह सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक आणि संजय नार्वेकर हे दिग्गज कलाकारही चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. चित्रपटातील कलाकारांसह निर्माते आणि सर्व सहकारी यांनी आनंदोत्सव साजरा करून या चित्रपटाच्या प्रक्षेपणाच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून पुन्हा एकदा खळखळून हसण्यासाठी रसिक प्रेक्षक सुद्धा आतुर झाले आहेत.
चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले असून, हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक मोठी भेट ठरणार आहे. विशेष म्हणजे ईओडी मीडिया पुणे कंपनीचे संचालक पुष्कर यावलकर यांनी एव्हीकेसोबत हातमिळवणी करत मराठी चित्रपट निर्मितीक्षेत्रात आपले पहिले दमदार पाऊल ठेवले आहे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी निर्माता म्हणून ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ मध्ये पुष्कर यांची महत्त्वाची भूमिका आहे. पुष्कर यावलकर मूळ जळगाव येथील आहे. अमेय विनोद खोपकर पिक्चर्स (एव्हीके), उदाहरणार्थ निर्मित, प्रस्तुत या चित्रपटाचे सुधीर कोलते, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत.
प्रत्येक क्षण अविस्मरणीय : अंकुश चौधरी
दिग्दर्शक अंकुश चौधरी हे या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत उत्सुक असून या चित्रपटाबद्दल बोलतांना त्यांनी म्हटले कि, “या चित्रपटाच्या सिक्वेल येणे हे खूप खास आहे. नुकतेच चित्रीकरण संपले असून चित्रीकरणाचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता आणि कलाकार व निर्मात्यांच्या मेहनतीने हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच यशस्वी होईल. प्रेक्षकांना ही नवी धमाल नक्कीच आवडेल. असे ते म्हणाले.
चित्रपटाचा भाग होणे अभिमानास्पद : पुष्कर
मूळ जळगाव येथील सध्या पुणे येथे असलेल्या स्व निर्मित ईओडी मीडिया कंपनीचे संचालक आणि चित्रपटाचे निर्माते पुष्कर यावलकर यांनी या चित्रपटाबद्दल बोलतांना सांगितले की, अमेय खोपकर आणि निनाद बत्तीन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप खास होता. नुकतेच चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाले असून या सगळ्या टीमसोबत एकत्र काम करण्याचा अनुभव खूप कमाल आणि धमाल होता. कोणत्याही भाषेतील चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणे हे साधे सोपे नाही. मात्र हा माझ्यासाठी एक मोठा प्रवास आहे आणि तो या टीमसोबत खूप आनंददायी तितकाच उत्साही झाला. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ सारख्या चित्रपटाचा भाग होणे, ही खूप अभिमानास्पद बाब आहे.