भगवद्गीता अध्याय १५ वा : भाग ८

श्लोक-क्रं-१९
यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम्।
स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत॥१९॥
अन्वयार्थ-संधिविग्रह- य: माम् एवम् असंमूढ: जानाति प्रुषोत्तमम्। स: सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत॥१९॥
श्लोकाचा सरळ अर्थ-हे अर्जुना, जो मोह, अज्ञान नसलेला अर्थात् ज्ञानी मनुष्य या प्रकारे मला पुरुषोत्तमाला सर्वश्रेष्ठ रुपाने जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष, सर्वत्र मीच भरलो आहे अशा भावनेने माझी उपासना [भक्ती] करतो। स्पष्टीकरण- जो असंमूढ, ज्याला कोणताही मोह नाही, अज्ञान नाही असा ज्ञानी मनुष्य माझे अशा प्रकारच्या माझ्या स्वरुपाला जाणतो, तोच ज्ञानी मनुष्य सर्वत्र मीच, एक ईश्वरच व्यापलेला आहे असे जाणून सर्व भावांनी [सर्व शारिरिक, मानसिक सर्व भावनांनी, मनाने] माझी उपासना, भक्ती करतो। परमेश्वराचे स्वरुप समजल्या शिवाय आपण त्याला जाणू शकत नाही, म्ह्णूनच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला “पुरुषोत्तमाचे स्वरुप” सविस्तर समजून सांगीतले. .
श्लोक-क्रं-२०
इति गुह्यतमं शास्रमिदमुक्तं मयाऽनघ।
एतद्बुध्वा बुध्दिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत॥२०॥
श्लोकाचा अन्वयार्थ-संधिविग्रह- इति गुह्यतमम् शास्रम् इदम् उक्तम् मया अनघ। एतद् बुध्वा बुध्दिमान् स्यात् कृतकृत्य: च भारत॥
श्लोकाचा सरळ अर्थ- हे निष्पाप अर्जुना, या प्रमाणे हे अत्यंत गुह्य शास्र मी तुला सांगीतले, ते तत्वत: जाणल्याने मनुष्य बुधिमान म्हणजे जाणता व कृतकृत्य होतो। स्पष्टीकरण-“अनघ” म्हणजे पाप न करणारा, अघ म्हणजे पाप, निष्पाप। हे निष्पाप अर्जुना, हे अत्यंत गुह्य शास्र, ज्ञान, [सर्वात गुह्य म्हणजे गुह्यतम] मी तुला सांगितले। या ज्ञानाचा बोध झाला असता, हे ज्ञान समजून घेतले तर मनुष्य बुध्दिमान होतो। व कृतकृत्य होतो। “कृतकृत्य” जे करणे योग्य आहे ते त्याने पूर्ण केले असे समजावे। ज्याने हा “पुरुषोत्तम योग” नावाचा अध्याय पूर्णपणे समजून घेतला त्याचे जीवन सार्थक झाले, त्याने आपल्या जीवनाचे सार्थक केले असे समजावे।
ज्ञानेश्वर महाराजांनी १५ व्या अध्यायाचे सार व उद्देश ज्ञानेश्वरीत एकाच ओवीत सांगीतले, १५ व्या अध्यायाचा अभ्यास का करायचा? याचा फायदा काय?
“करुनी संसार वावो। स्वरुपी अहंते ठावो।
होआवया अध्यावो पंधरावा हा॥१५-४३॥“
॥ज्ञानेश्वरी॥
दिसणारा संपुर्ण संसार, प्रपंच, जग, जगातील सुखे मिथ्या आहेत, त्यामुळे सर्व संसार (जग) मिथ्या समजून त्याबद्दल पूर्ण अनासक्त होऊन आपले स्व-स्वरुपाचे ठिकाणी लक्ष्य लावावे, मी आत्मा आहे, मी शिव आहे, मी ब्रम्ह आहे, चिदानंदरुप: शिवोऽहं हा स्वनुभव घ्यावा व स्व-स्वरुपात कायम चे अवस्थित व्हावे हा च या १५ व्या “पुरुषोत्तम योग” नावाच्या अध्यायाचा उद्देश आहे। स्व-स्वरुपानुभूति। अनेक जन्मांच्या आसक्ती मुळे हा जीव जन्म-मृत्यु च्या चक्रात भ्रमण करतो आहे, त्याची आसक्ती नष्ट होऊन स्व-स्वरुपाचा अनुभव यावा, व स्व-स्वरुपच व्हावे। हाच उद्देश आहे।
जे वि विषे रांधिली रससोये।
जे जेवणारा ठाऊवी होये।
तै तो ताटचि सांडूनि जाये।
जियापरी॥१५-३८॥
तैसी संसार या समस्ता।
जाणिजे जै अनित्यता।
तै वैराग्य दवडिता पाठी लागे॥१५-३९॥
करुनी संसार वावो।
स्वरुपी अहंते ठावो।
होआवया अध्यावो पंधरावा हा॥१५-४३॥
समाप्त

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२


