भगवद्गीता अध्याय १५ : भाग ३
न रूपमस्येह तथोपलभ्यते,
नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा।
अश्वत्थमेनं सुविरुढमूल-म
संगशस्रेण दृढेन छित्त्वा॥३॥
श्लोकाचा अन्वयार्थ-(संधि विग्रह)- न रूपम् (स्वरुप) अस्य (या वृक्षाचे) इह (येथे) तथा (त्या प्रमाणे) उपलभ्यते। (सापडत नाही)। न अन्त: न च आदि: न च संप्रतिष्ठा। अश्वत्थं (या प्रपंच रुपी पिंपळाच्या वृक्षाला) एनम् (या) सुविरुढमूलम् (ज्याचे मूल अत्यंत खोल गेले आहे अशा) असंगशस्रेण (असंग म्हणजे अनासक्त किंवा वैराग्य रुपी शस्राने) दृढेन छित्वा। (तोडून)
श्लोकाचा सरळ अर्थ- त्याचे रुप दिसत नाही; त्याप्रमाणे त्याचा अंत, आरंभ व स्थिती [संप्रतिष्ठा] ही दिसत नाही। ज्याची मुळे पुष्कळ वाढलेली आहेत अशा या अश्वत्थ वृक्षाला अनासक्तिरुप तीक्ष्ण शस्राने तोडून,
स्पष्टीकरण- या प्रपंचरुपी वृक्षाचे स्वरुप डोळ्यांनी दिसत नाही, त्याचे यथार्थ स्वरुप समजत नाही। दिसणारे संपूर्ण जग, ब्रम्हांड हेच त्याचे रुप आहे, पण त्याचे ज्ञान होत नाही। या ब्रम्हांडाला सुरुवात ही नाही व शेवट ही नाही, असा अनादि, अनंत हा प्रपंच-वृक्ष आहे। दृश्यमान विश्वाबद्दल खूप माहिती आहे, पण येथे थोडक्यात दिले आहे। या प्रपंच रुपी वृक्षाची मूळे खोलवर गेलेली आहेत, त्यामुळे त्यांना तोडणे अत्यंत कठीण आहे। त्याला एकच उपाय आहे, असंगशस्र म्हणजे अनासक्त राहाणे। यालाच “वैराग्य” असे नाव आहे।
वैराग्य म्हणजे सर्व सोडून जंगलात जाणे किंवा संन्यास घेणे असे नाही। प्रपंचात राहूनच ही स्थिती प्राप्त करायची आहे। मनातला “मी-पणा-म्हणजे अहंकार व “माझे-पण” म्हणजे आसक्ती हे २ दोष मनातून काढून टाकणे।” ज्ञानेश्वर महाराजांनी याचे सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीत केले आहे। “मी-माझे ऐसी आठवण। विसरले जयाचे अंत:करण। पार्था तो संन्यासी जाण। निरंतर॥ ज्ञानेश्वरी॥ या असंग अनासक्ति रुपी ज्ञान शस्राने या वृक्षाची मूळे तोडता येतात। या प्रकारे ती मूळे छेदून पुढील ईश्वर प्रातीचा मार्ग आक्रमण करावा। अध्यात्मिक विषय एकदा वाचून समजत नाही, पुहा पुन्हा अभ्यास करावा लागतो। तेव्हाच पूर्ण ज्ञान प्राप्त होते।

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२