चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील शेतकरी सध्या पडत्या बाजारभावांमुळे आर्थिक संकटात सापडले असून या ज्वलंत प्रश्नावर आमदार करण देवतळे यांनी विधानसभेत ठाम भूमिका मांडली. यावेळी सोयाबीन, कापूस आणि चना या पिकांना मिळत असलेल्या कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.
प्रसंगी देवतळे यांनी सांगितले की, शासनाने चण्याचा हमीभाव ५ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला असला तरी प्रत्यक्ष बाजारात शेतकऱ्यांना सुमारे ४ हजार १०० रुपये दर मिळत आहे. हमीभाव आणि बाजारभावातील मोठ्या तफावतीमुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळत नसून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत. यामुळे बाजारभावातील घसरणीचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अलीकडील अवकाळी पावसामुळे चना, गहू, तूर आणि मिरची या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत पिकांचे उत्पादन घटले असून शेतकऱ्यांना चणा साठवून ठेवावा लागत आहे. मात्र, हमीभाव खरेदीसाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू नसल्याने खरेदीला विलंब होत असल्याचा मुद्दाही देवतळे यांनी सभागृहात उपस्थित केला.
याशिवाय, तालुक्यातील सुमारे २२ हजार ४२८ हेक्टर क्षेत्रात चन्याची लागवड झालेली असून या उत्पादनाची हमीभावाने खरेदी तातडीने सुरू करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, हमीभाव खरेदीसाठी त्वरित नोंदणी प्रक्रिया सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार करण देवतळे यांनी शासनाकडे केली.
तसेच, देवतळे यांनी पुढे सांगितले की, अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, काही ठिकाणी पंचनामे आणि नुकसानभरपाई प्रक्रियेलाही विलंब होत असल्याने शेतकरी अधिकच अडचणीत सापडत आहेत. त्यामुळे शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
अखेरीस, शेतकऱ्यांच्या चना खरेदी, हमीभाव आणि पडते बाजारभाव या प्रश्नावर शासन काय भूमिका घेते याकडे आता शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. देवतळे यांनी सभागृहात मांडलेल्या या मागणीमुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

