खान्देशातील आखाजी खापरेवरची पुरणपोळी अन् नात्यातील गोडवा !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातील वेगवेगळी खाद्यसंस्कृती प्रसिध्द व प्रचलित असते. त्याचप्रमाणे जळगाव जिल्हाच नव्हे खान्देशातील खाद्य संस्कृतीतील एक महत्वाचा खाद्यपदार्थ म्हणजेच खापरावरची पुरणपोळी.. अनेक वर्षांपासून पंरपरा असलेल्या या पुरणपोळीतून अक्षतृतीया असो की विविध सण उत्सवांमध्ये नात्यांमधील गोडवा जपला जातोय. खायला जेवढी चवीष्ट तेवढीच ही पुरणपोळी बनविण्याची पध्दतही अगदी मजेशीर अशीच आहे. तर पाहुयात कशी तयार होते खापरावरची ही पुरणपोळी…

खानदेशात सर्वच सण उत्सवांसाठी आणि एरवी कोणीही पाहुणे आले तरी पुरणपोळी किंवा खापरावरची पोळी तयार करण्याची अगदी जुनी परंपरा आहे. मात्र ही परंपरा टिकून ठेवण्याचं काम आजच्या काळातील काही महिलांकडून केलंय जातंय. खापरावरची पुरणपोळी करण्यासाठी त्यामागची मेहनत सुध्दा खुप मोठी असते. अगदी पहाटे उठुन डाळ शिजवण्यापासून तर त्यानंतर पीठ मळणे, पुरण तयार करण्यासह प्रत्यक्षात खापरावर पुरण पोळी तयार करण्यापर्यंतची मोठी कसरत असते. मातीचे खापर चुलीवर ठेवतात आणि त्यावर सारण भरलेली पोळी भाजतात. रुमाली रोटीसारखी ही पोळी बायका हातावर मोठी करतात. पुरणपोळीची घडी करण्याची ही अनोखी पध्दत असते. अशाप्रकारे ही खापरावरची पुरणपोळी तयार करताना पहाणे हा एक सुंदर अनुभव असतो.

ग्रामीण भागांमध्ये आजही परंपरा कायम असून अहिराणी गाणे म्हणत, खापरावरची पुरणपोळी तयार करण्याचा आनंद घेतला जातो. प्रत्येक सण उत्सवात वातावरणानुसार पुरणपोळी वेगवगळया पदार्थांसोबत खाल्ली जाते. अक्षय तृतीया सणात ती आंब्याच्या रसासोबत तर इतरवेळी खीरसोबत खाल्ली जाते. एरवी कोणीही पाहुणे आले तरी पुरणपोळी किंवा खापरावरची पोळी-खीर, आंब्याचा रस, हरभऱ्याच्या डाळीची रस्सी म्हणजे मसालेदार आमटी, भात, पापड, कुरडया, बिबड्या, कांद्याची भजी असा भरगच्च बेत असतो. असा हा पाहुणचार करुन पाहुणे कसे अगदी खुश होवून जातात.

खापरावरची पुरणपोळी अन् तिच्या सोबत विविध खादृयपदार्थांनी भरलेले जेवणाचं ताट बघितल्यावर तोंडाला पाणी सुटतं. खाल्यावर तर मन अगदी तृप्त होतं.. ही दृष्य बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. मात्र खापरावरची पुरण पोळी खायची असेल तर तुम्हाला खान्देशातच यावं लागेल, तर मग येताय ना खान्देशातील खापरावरच्या पुरणपोळीच्या जेवणाचा पाहुणचार घ्यायला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here