‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच
राज ठाकरेंकडून मांजरेकरांचे कौतुक
मुंबई प्रतिनिधी
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या बहुचर्चित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा ट्रेलर ३ मिनिटे ३४ सेकंदांचा भव्य सोहळ्यात लोअर परळ येथील पीव्हीआर सिनेमागृहात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत लाँच झाला. या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमाल पातळीवर नेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातील बैठकीमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही.
https://youtu.be/rWGG7xnTFTU?t=158
ट्रेलर लाँच सोहळ्यात राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांचे मनापासून कौतुक केले. “महेश मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील यश चोप्रा आहेत. आम्हा दोघांमध्ये एक समानता आहे, ती म्हणजे भव्यता. २००९ चा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट मुंबई, पुणे, ठाणेपुरता मर्यादित होता, पण ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा संपूर्ण महाराष्ट्राचा चित्रपट आहे. महाराष्ट्र हा सिनेमा उचलून धरेल,” असे राज ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी शेतकरी आत्महत्या, मराठी माणसाचे स्थान आणि परप्रांतीयांचा मुजोरी यांसारख्या संवेदनशील विषयांना शिवाजी महाराजांच्या माध्यमातून मांडण्याचे मांजरेकरांचे धाडसही कौतुकास्पद ठरल्याचे नमूद केले.
चित्रपटाचा आशय आणि वैशिष्ट्ये
महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केले की, हा चित्रपट २००९ च्या चित्रपटाचा सिक्वेल नाही. “शेतकरी आत्महत्यांसारख्या गंभीर विषयावर मला काम करायचे होते. मराठी माणसाची आपल्या राज्यातील स्थिती आणि त्यावर शिवाजी महाराज काय प्रतिक्रिया देतील, यावर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट वर्तमान आणि इतिहासाचा संगम आहे,” असे मांजरेकर म्हणाले. यात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रखर रूप, मराठी अस्मिता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांचे चित्रण पाहायला मिळेल.
कलाकार आणि प्रदर्शन
चित्रपटात सिद्धार्थ बोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मांजरेकर यांनी भविष्यात मराठी चित्रपट हिंदीत डब करून ४५० कोटींची कमाई करण्याची आशा व्यक्त केली आहे.

