पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणात धक्कादायक वळण: पीडितेची तिसऱ्या अत्याचाराची तक्रार

पोलिसांवर गंभीर आरोप, विधी व न्याय विभागाला पत्र

0

पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणात धक्कादायक वळण: पीडितेची तिसऱ्या अत्याचाराची तक्रार

पोलिसांवर गंभीर आरोप, विधी व न्याय विभागाला पत्र

लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये २६ फेब्रुवारी २०२५ रोजी एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात आता नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने आरोपी दत्तात्रय गाडे याने तिसऱ्यांदा लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात तिने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी नोंदवल्या आहेत.

ही घटना स्वारगेट बस स्थानकात घडली, जिथे फलटणला जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला आरोपीने बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. तब्बल ७५ तासांच्या शोधानंतर पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. मात्र, या प्रकरणात पीडितेने पोलिसांच्या वागणुकीवर आणि तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

पीडितेच्या पत्रातील ठळक मुद्दे
पीडितेने तिच्या पत्रातून अनेक गंभीर बाबी मांडल्या आहेत:
वैद्यकीय तपासणीचा त्रास: “माझी संमती नसताना पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माझी तपासणी केली. मला त्याचा त्रास झाला,” असे तिने नमूद केले.

पोलिसांची असंवेदनशीलता:

“मला अनेक पुरुष पोलिसांना माझ्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पुन्हा पुन्हा सांगावी लागली, ज्यामुळे माझी मानसिक स्थिती आणखी खराब झाली.

तिसरा अत्याचाराचा प्रयत्न:

आरोपीने दोनदा बलात्कार केल्यानंतर तिसऱ्यांदा पार्श्वभागातून जबरदस्तीचा प्रयत्न केला. मी पूर्ण ताकदीने विरोध केला, तेव्हा तो पळून गेला,” असे तिने लिहिले.

वकिलांच्या नेमणुकीवर आक्षेप:

“पोलिसांनी मला तीन वकिलांची नावे सुचवून त्यातून एकाची निवड करण्याचे आश्वासन दिले होते. मी असीम सरोदे यांची मागणी केली, पण मला एक दिवस उशीर झाल्याचे सांगून दुसऱ्या वकिलाची नेमणूक केली. माझ्या म्हणण्याला कायदेशीर महत्त्व नाही का?”

“मला सध्याचे वकील अजय मिसार यांच्याबद्दल आता आक्षेप घ्यायचा नाही, पण माहितीशास्त्राचा अभ्यास केलेली असल्याने माझ्याकडे पुरेशी माहिती आहे,” असे तिने स्पष्ट केले.

जीव वाचवण्याची धडपड:

“घटनेच्या वेळी मी आरडाओरड केली, पण माझा आवाज खोल गेला. बलात्काराच्या घटनांमध्ये विरोध केल्याने मुलींची हत्या झाल्याच्या घटना आठवून मी जीव वाचवणे महत्त्वाचे मानले.

या पत्रातून पीडितेने पोलिसांच्या संवेदनशीलतेच्या अभावावर आणि तपासातील उणिवांवर बोट ठेवले आहे. तिने आपल्या पसंतीचे वकील असीम सरोदे यांची नेमणूक करण्याची मागणी पुन्हा केली असून, प्रशासनाने तिच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

या घटनेने पुण्यात महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून, पीडितेच्या पत्रामुळे पोलिस आणि वैद्यकीय यंत्रणेवर दबाव वाढला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.