भयंकर.. पुण्यात 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू

कंपनीची गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुण्यात आज सकाळी भयंकर घटना घडली. ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्याने चार जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी फेज वनमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुधवारी सकाळी जवळपास आठ वाजण्याच्या सुमारास हिंजवडी  फेज वनमध्ये ट्रॅव्हलर आत जात असताना ड्रायव्हरच्या पायाखाली अचानक आग लागली. गाडीला आग लागल्याचं चालकाच्या लक्षात येताच त्याच्यासह पुढील बाजूस बसलेले कर्मचारी गाडीतून तात्काळ खाली उतरले. मात्र, यावेळी मागील दरवाजा उघडता न आल्यामुळे मागच्या सीटवर बसलेल्या चार कर्मचारी अडकले आणि त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर या अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालायात उपचार सुरू आहेत. जखमींना हिंजवडी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. अद्याप मयतांची आणि जखमींची नावे समजू शकली नाहीत. मात्र, ऑफिस व कंपनीत जाण्याच्या वेळेत ही दुर्घटना घडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती. या सर्व घटनेचा हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, टेम्पोच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.