पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या पुणे शहर परिसरात गेल्या बऱ्याच दिवसांपासून गुन्हेगारी संबंधीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून पाच अल्पवयीन मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हडपसरमधील रामटेकडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एक ते तीनच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती देण्यात आली आहे.

महादेव रघुनाथ मोरे (वय २६ रा. काळेपडळमी, हडपसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. वानवडी पोलिसांनी याप्रकरणी ५ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दहाला केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव आणि अल्पवयीन ५ मुले एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. यातील एक मुलगा शाळेत शिक्षण घेत आहे. इतर जण रोजंदारीने आपले पोट भरतात. तर हत्या झालेला तरुण हा खाजगी कंपनीत कामाला होता.
काही दिवसांपूर्वी आरोपी मुले आणि महादेव हे भेटले. त्यावेळी किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद निर्माण झाला. मुलांनी या गोष्टीचा राग मनात ठेऊन, पुन्हा महादेवची भेट घेतली. यावेळी हे सर्वजण रामटेकडी परिसरातील ढेरे कंपनीजवळ डोंगरावर मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी गेले. तिथे त्यांच्यात पुन्हा वाद झाले. वादाचे रुपांतर हाणामरीत होऊन मुलांनी त्याला मारहाण करत दगडाने ठेचले आणि हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


