जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
रोटरी क्लब जळगाव व रोटरी क्लब जळगाव इलाईट यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रोटरी भवन, मायादेवी नगर, जळगाव येथे होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट श्री. श्रीराम देशपांडे (धुळे) उपस्थित राहणार आहेत. श्री. देशपांडे हे बी.कॉम., एम.कॉम. (पुणे विद्यापीठ गुणवत्ता यादीत ९ वा क्रमांक) असून १९८९ साली चार्टर्ड अकाउंटंट झाले. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ते अर्थसंकल्प, कररचना, सहकारी बँका, उद्योग व शेअर बाजार या विषयांवर राज्यभर व्याख्याने देत आहेत.
ते पी. डी. दलाल अँड कंपनी, धुळे या चार्टर्ड अकाउंटंट फर्मचे भागीदार असून, जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक व माजी उपाध्यक्ष आहेत. तसेच भारत सरकारच्या ‘मिनीरत्न’ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम South Eastern Coalfields Ltd. येथे त्यांनी स्वतंत्र संचालक म्हणूनही काम केले आहे. सहकारी बँकिंग व आर्थिक शिस्त या विषयांवरील त्यांचे लेखन व मार्गदर्शन सर्वदूर प्रसिद्ध आहे.
या व्याख्यानात केंद्रीय अर्थसंकल्पाचा सामान्य नागरिक, उद्योग, व्यापारी, विद्यार्थी व उद्योजकांवर होणारा परिणाम सोप्या पद्धतीने उलगडला जाणार आहे. कार्यक्रमात रोटरी क्लब जळगावचा चार्टर डे साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून जळगावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष गिरीश कुळकर्णी व संदीप झवर यांनी केले आहे.