चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यात नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उत्खननाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही दुर्लक्ष करणारे चोपडा महसूल अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या संपत्तीची ईडी, इन्कमटॅक्स व आर्थिक गुन्हे शाखा कडून चौकशी करण्यात यावी या मुख्य मागणीसह विविध तक्रारींचे निवेदन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना सर्व पक्षीय व भारतीय पत्रकार महासंघ यांच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यकाळात वाळू व गौण खनिज प्रकरणांमध्ये संशयास्पद दुर्लक्ष, विविध गंभीर अनियमितता, कर्तव्यातील कसूर, नागरिकांशी गैरवर्तन, शासकीय कामकाजातील दिरंगाई, पत्रकारांना मिळणारी अपमानास्पद वागणूक अशा अनेक तक्रारी संबंधित प्रशासकीय कार्यालयांकडे प्राप्त झालेल्या आहेत. उपलब्ध तक्रारी, वृत्तपत्रीय बातम्या, शासकीय नोटिसा व इतर कागदपत्रांवरून या प्रकरणांची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.
दि.3 जून रोजी याविषयी पत्रकारांनी लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांनी स्वीकारले होते. त्यावर अद्याप पावतो कोणतीही कायदेशीर कारवाई तहसीलदार चोपडा, मंडळ अधिकारी चहार्डी भाग, तलाठी निमगव्हाण- तांदलवाडी यांच्यावर झालेली दिसून येत नाही. त्यामुळे चोपडा तालुक्यातील सर्व पक्षीय व भारतीय पत्रकार महासंघ यांच्यावतीने सोमवारी दि. 29 जून रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालय येथे विराट जनआंदोलन करण्यात येणार आहे.
निवेदनावर माजी आमदार कैलास पाटील, नरेंद्र पाटील, संजय सोनवणे, बाळासाहेब पाटील, देवेंद्र सोनवणे, अनिल वानखेडे, डॉ.चंद्रकांत बारेला, नारायण पाटील, सौ. सोनाली नारायण पाटील, शशिकांत देवरे, शशिकांत पाटील, विलास पाटील, नंदलाल मराठे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देते वेळी डॉ. चंद्रकांत बारेला, शशिकांत देवरे, नंदलाल मराठे, विलास पाटील, अमोल राजपूत आदी उपस्थित होते.


