लोकशाही संपादकीय लेख
जळगाव जिल्ह्यातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आज जळगावात माजी आमदार बच्चू कडू, माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात दुपारी एक वाजता निघाला. या शेतकरी आक्रोश मोर्चात “ना पक्ष.. ना झेंडा.. फक्त शेतकरी हाच अजेंडा” हा विषय घेऊन सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी होते. मोर्चाला उत्तम असा शेतकऱ्यांचा प्रतिसाद होता. कापसाला हमीभाव द्या.. केळीला हमीभाव द्या.. सोयाबीन, ज्वारीला हमीभाव द्या.. पिक विमा योजना पुन्हा सुरू करा.. संपूर्ण कर्जमुक्ती करा.. आदी 14 मागण्यांचे निवेदन घेऊन शेतकरी आक्रोश मोर्चा स्थानिक शिवतीर्थ मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. मोर्चात बैतगाड्या, ट्रॅक्टर आदींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
विविध प्रकारच्या घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात गेला. तिथे मोर्चाला समोर जाऊन सामोरे जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह कोणीही अधिकारी आला नाही, म्हणून संतप्त शेतकरी “अधिकाऱ्यांनी आले पाहिजे” हा हट्ट धरला. परंतु अधिकारी काही केल्या आले नाही. मोर्चातील शेतकरी संतापले. जय जवान जय किसानच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बाजूला सारून पोलिसांना न जुमानता कार्यालय परिसरात आले. त्यांना निवेदन दिले गेले, परंतु दरम्यान मोर्चेकर्यांकडून निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही अधिकारी मोर्चेकरांना सामोरे गेले नसताना संताप वाढला होता. कसला तरी अनुचित प्रकार शेतकऱ्यांकडून होतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा द्वारे रस्त्यावर उतरून आपली ताकद सरकारच्या निषेधार्थ आणून दिली. सर्वपक्षीय मोर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात निघेल, याची प्रशासनाला शाश्वती नव्हती. त्यामुळे पोलीस बंदोबस्त ही हवा तितका कडक नव्हता हे विशेष..
महाराष्ट्रात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध विरोधी पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा निघत आहे. परंतु जळगावच्या आक्रोश मोर्चात मोर्चाचे वैशिष्ट्य हे होते की, या मोर्चात सर्व पक्ष सामील झाले होते. कोण्या एका पक्षाचा झेंडा या मोर्चात नव्हता. ना पक्ष ना झेंडा.. शेतकरी हाच अजेंडा.. अशा धोरणामुळे जळगावच्या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्या मोर्चात सर्व शेतकरी संघटनांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारींनी सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस साजरा होत असतानाच शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चात काळ्या रिबीन लावून शासनाचा निषेधही व्यक्त केला. मोर्चातील नेते बच्चू कडू, माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शासनावर जोरदार हल्ला केला. मोर्चामध्ये सामील शेतकरी अत्यंत पोट तिडकीने आपल्या भावना व्यक्त करीत होते. फक्त शेतकऱ्यांच्या मागण्यांचा अजेंडा घेऊन काढण्यात आलेल्या जळगाव मधील आक्रोश मोर्चाची दखल शासनाला घ्यावी लागेल यात शंका नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर या आक्रोश मोर्चाचा निश्चित परिणाम होईल. एकीकडे शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आणि जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीने झालेल्या शेतीचे मोठे नुकसान आणि शेतकरी कुटुंबावर ओढावलेले संकट या दुहेरी प्रकरणामुळे महाराष्ट्र शासनाला जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दखल घेणे भाग आहे..!