मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी मुक्ताईनगरात विविध सामाजिक, विद्यार्थी व राजकीय संघटनांच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रवर्तन चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. प्रवर्तन चौक, भुसावळ रोड, संताजी नगर मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी व शहरातील नागरिक सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच प्रवर्तन चौकात लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहिमेचेही आयोजन करण्यात आले.
मोर्चानंतर मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात 20 जुलै रोजी दिल्ली येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक व अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली नीट पेपरफुटीच्या विरोधात सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनावर पोलीस, आर. ए. एफ. चे जवान व काही असामाजिक घटकांनी कथितपणे लाठीचार्ज करून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा निषेध नोंदविण्यात आला आहे.

निवेदनात या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात प्रशासनाला इशारा देताना, सात दिवसांच्या आत योग्य कारवाई न झाल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. मोर्चा व सभेला मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मेढे, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते ॲड. अरविंद गोसावी, मुस्लिम मन्यार बिरादरीचे हकीम चौधरी, विद्यार्थिनी सिद्धी राणे, ॲड. चेतन झनके, ॲड. कुणाल गवई, ॲड. पवन पाटील, ॲड. राहुल पाटील, प्रमोद सौंदळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या आंदोलनात काँग्रेस, उबाठा शिवसेना, ऑल इंडिया पँथर सेना, आंतरराष्ट्रीय प्रारंभिक मानव अधिकार संघटना, भारत मुक्ती मोर्चा, मुस्लिम मन्यार बिरादरी आदी विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
कडकडीत बंदला प्रतिसाद
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुक्ताईनगर शहरात सकाळपासून दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा व औषधांची दुकाने वगळता शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली. या बंदला व्यापारी वर्गानेही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी शहरातील प्रवर्तन चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेतली. सभेत केंद्र सरकार व केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान शहरात शांततेत बंद पाळण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली.


