यावल शहर

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी कथित गैरवर्तन, शिवीगाळ, दमदाटी व मारहाणीचा प्रयत्न केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच, यावल यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प कार्यालयात विविध कर्मचारी संघटनांच्या सहभागातून आंदोलन करण्यात आले.
संघटनेच्या निवेदनानुसार, फैजपूर येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहाचे गृहपाल तथा प्रभारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद इस्माईल तडवी, प्रकल्प कार्यालयातील कार्यालय अधीक्षक राकेश अहिरे, कनिष्ठ लिपिक विनोद तायडे यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत असताना एका ठेकेदाराने शिवीगाळ, अपमानास्पद वर्तन करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा तसेच कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी संबंधित ठेकेदारास तात्काळ अटक करावी, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई करावी, आदिवासी विकास विभागाच्या सर्व कामकाजातून त्याला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) समाविष्ट करावे, तसेच प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
या आंदोलनाला आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य (नाशिक) प्रकल्प यावल, आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच, स्वाभिमानी शिक्षक-शिक्षकेतर संघटना (जिल्हा जळगाव), सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटना, यावल तसेच विविध कर्मचारी व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि भयमुक्त वातावरणात काम करण्याचा अधिकार असल्याचे नमूद केले. शासकीय कर्तव्य बजावत असताना गैरवर्तन किंवा दबावाचे प्रकार प्रशासनासाठी घातक असल्याने दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर करून मागण्यांची तातडीने दखल घेण्याचे आवाहन केले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी, गृहपाल, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


