जळगाव : जळगाव तालुक्यातील रिधूर गावात सार्वजनिक रस्त्याच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान भीषण हाणामारीत झाले. गुरांच्या शेडसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्यात खड्डे खोदण्यास विरोध केल्याच्या कारणावरून पाच जणांच्या टोळीने दोन भावांवर लोखंडी पहार व दांडक्यांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी (१८ जानेवारी) दुपारी सुमारे चार वाजता घडली. या प्रकरणी रात्री ११ वाजता पाच जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिधूर येथील रहिवासी धनराज बुधा पाटील (वय ५१) व त्यांचे भाऊ वसंत पाटील हे रविवारी दुपारी आपल्या घरासमोर उभे होते. यावेळी गावातीलच शरद एकनाथ कोळी हा गुरांच्या शेडसाठी सार्वजनिक रस्त्यात खड्डे खोदून बांधकाम करत होता. सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात येताच पाटील बंधूंनी त्यास विरोध केला.
याचा राग आल्याने आरोपी शरद एकनाथ कोळी, विशाल ईश्वर कोळी, अजय ईश्वर कोळी, अनिताबाई शरद कोळी व अक्षय सूर्यभान कोळी यांनी संगनमत करून पाटील बंधूंना अश्लील शिवीगाळ केली. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान शरद कोळी याने हातातील जड लोखंडी पहारीने वसंत पाटील यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात वसंत पाटील गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्याच वेळी विशाल कोळी याने लाकडी दांडक्याने फिर्यादी धनराज पाटील यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांनाही जखमी केले.
घटनेनंतर दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. फिर्यादी धनराज पाटील यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संबंधित पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय निकम या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.