चोपड्यातील कुंटणखाना धाडीचा अन्वयार्थ..!

0

लोकशाही संपादकीय लेख

चोपडा येथे दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात खुलेआम चालत असलेल्या कुंटण खाण्यावर भर दुपारी धाड टाकून देहविक्री करणाऱ्या ३६ महिला आणि कुंटण खाण्यात चालवणाऱ्या ७ महिलांना चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले. चोपडा नगरपालिका कार्यालयाच्या मागे अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या झोपड्यांमध्ये चालणाऱ्या या कुंटणखान्यात जळगाव जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, नेपाळ आदी राज्यातील तरुणी आढळून आल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात चालणारा कुंटणखाना हा अनेक वर्षांपासून चालत होता. तो कुणाच्या आशीर्वादाने? चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सहाय्यक पोलीस अधीक्षक ‘कृषीकेश रावले’ हे आयपीएस अधिकारी नुकतेच रुजू झाले. त्यांच्या नजरेत हा कुंटणखाना आला आणि त्यांनी त्यांच्या पोलीस पथकासह धाड टाकली तर हा प्रकार उघडकीस आला. यामुळे त्याचे सर्व श्रेय कृषीकेश रावले यांना द्यावे लागेल. चोपडा नगरपालिकेच्या मागे नगरपालिकेच्या खुल्या जागेवर झोपड्या उभारून त्या झोपड्यांमध्ये कुकर्म चालत होते, याची त्या परिसरातील नागरिकांना तसेच चोपडा शहर पोलिसांना याची माहिती नव्हती का? नगरपालिकेच्या पाठीमागे खुल्या जागेत झालेल्या अतिक्रमित झोपड्यांमध्ये काम चालते, याची किंचितही कल्पना चोपडा नगरपालिका आणि अतिक्रमण विभागाला आली नाही का? या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची झाली तर ती ‘तेरी भी चूप मेरी भी चुप’ अथवा ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ याप्रमाणे होईल. झोपलेल्यांना उठवता येते पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवणे अवघड जाते. तशातला हा प्रकार आहे. प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेले असल्याने जाहीरपणे या कुंटणखाण्या विरोधात तक्रार करायला कोणी पुढे आलेला नाही. पोलिसांच्या बाबतीत बोलायचे झाले तर अर्थपूर्ण संबंधामुळे पोलिसांकडून आतापर्यंत कारवाई झालेली नाही. नगरपालिकेच्या मागील बाजूस झोपड्यांवर चालणाऱ्या या कुंटणखाण्यामुळे जिल्ह्यातील आंबट शौकिनांची गर्दी दिवसेंदिवस वाढली. या परिसरातील बियर बार असलेले दोन हॉटेल्स सतत हाउसफुल चालायचे. कारण काय हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. एवढे असताना या झोपड्यांमध्ये ३६ तरुणींकडून अनधिकृतपणे देहविक्री व्यवसाय चालतो, हे चोपडा पोलिसांच्या लक्षात येऊ नये, याच्या इतके दुर्दैव ते काय? अधिकारी कृषीकेश रावले यांनी त्यांचे नेतृत्वात धाड टाकल्यामुळे चोपडा पोलिसांची आतापर्यंत झाकलेली पोलखोल झाली. त्यांच्या नैतिकतेचे धिंडवडे निघाले. कुंटणखाण्यावर येणाऱ्या आंबट-शौकिनांमुळे गुंडगिरी वाढते. त्याचा परिणाम चोपड्यातील वाढत्या गुन्हेगारीवर होऊन गुन्हेगारी वाढली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे का? चोपडा कुंटणखाना वाढीचा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी गंभीर नोंद घेऊन याचा तपास करण्याची गरज आहे…!

वेश्या व्यवसायासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांची वेगळी मते आहेत. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला संदर्भात ती सामाजिक गरज असल्याचे समाज सुधारकांचे म्हणणे आहे. त्याबाबत मत मतांतर असू शकतात. त्या बाबत आम्हाला काही म्हणायचे नाही. परंतु अनधिकृतपणे एवढा मोठ्या प्रमाणात चालणारा कुंटणखाना चालू द्यायचा का? हा खरा प्रश्न आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे वैतागवाडी भागात असाच अनधिकृत वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत होता. आता तो तेथे नाही. पाचोरा तालुक्यातील माहेजी हे गाव सुद्धा अनधिकृत वेश्याव्यवसायासाठी गाजलेले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याच्या सुयश कथा आहेत. माहेजीच्या व्यवसायावर सुद्धा पोलिसांच्या हातोड्यामुळे नियंत्रण आले. अंमळनेर येथे सुद्धा चोपड्याप्रमाणे अनधिकृतपणे वेश्याव्यवसाय चालत होता. तो सुद्धा पोलिसांच्या कारवाईमुळे आता बंद आहे. तथापि अमळनेर छुप्या पद्धतीने अजून चालू असल्याची चर्चा आहे. जळगाव शहरातील बळीराम पेठेत अशाच प्रकारे अनधिकृत वेश्या व्यवसाय चालत होता. त्यामुळे बळीराम पेठेवर बदनामीचा शिक्का बसला होता. त्यात भरीस भर म्हणून लोकनाट्याच्या नावाने हैदरी थिएटरमध्ये डान्स चालत होता. लोककलेच्या नावाने किंवा लोककला जिवंत ठेवण्यासाठी सरकारने त्याला परवाना दिला होता. तथापि बळीराम पेठेत आणि परिसरातील नागरिकांनी उभारलेल्या आंदोलनामुळे शासनाने हैदरी थिएटरचा परवाना रद्द करून त्यांना गावाबाहेर थेटरसाठी जागा देऊन तेथे परवाना दिला होता. तथापि हे थेटर नव्या जागेत अद्याप सुरू झालेले नाही. जळगावच्या तथाकथित सेक्स कॅण्डलमुळे जळगाव शहराची फार मोठी बदनामी झाली. चोपडा शहरातील कुंटण खाल्ल्यामुळे शहरातील तरुणांवर वेगळाच संस्कार होत नसेल, असे म्हणता येईल का? एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालणारा कुंटणखाणा कुणाच्यातरी आशीर्वादामुळे शक्य नाही. कुंटणखाना चालवणाऱ्या महिलांकडून हे शक्य आहे. त्यामुळे आता या महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांची कडक तपासणी केली तरच यामागे कुणाचा हात आहे, ते बाहेर येईल. या कुंटणखाना परिसरात कस्तुरबा विद्यालय आहे. तेथील विद्यार्थी, शिक्षक तसेच त्या शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या पालकांवर काय परिणाम होत असेल, याची लाज संबंधितांनी राखायला हवी होती…!

Leave A Reply

Your email address will not be published.