वरणगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरात अद्याप स्वतंत्र व सुसज्ज क्रीडांगण नसल्याने शहरातील खेळाडूंना सरावासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर वरणगाव शहरात आधुनिक क्रीडांगण मंजूर करण्यात यावे, अशी मागणी करणारा प्रस्ताव सुनील काळे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री ना. रक्षा खडसे यांच्याकडे सुपूर्द केला.
नगर परिषदेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या या प्रस्तावासोबत संबंधित जागांचे सातबारा उतारेही सादर करण्यात आले. शहरातील भिलेश्वर ट्रस्टची क्रीडांगणासाठी आरक्षित जागा, जुन्या गावातील नगर परिषदेने आरक्षित केलेली जागा, तसेच नगर परिषदेच्या मालकीच्या भूखंडांचा क्रीडांगणासाठी विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये पवननगरजवळील सुमारे १३ एकर जागा तसेच सिद्धेश्वरनगरजवळील नगर परिषदेच्या मालकीच्या भूखंडाचा पर्यायही प्रस्तावात सुचविण्यात आला आहे.
नगराध्यक्ष यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांची भेट घेऊन प्रस्तावातील विविध जागांची माहिती व उपलब्ध क्षेत्राबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले. शहरातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच विविध क्रीडा प्रकारांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी आधुनिक क्रीडांगणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध झाल्यास युवा खेळाडूंना मोठी संधी मिळणार असून, विविध क्रीडा प्रकारांमध्ये शहराचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी नगरसेवक नाना चौधरी, शामराव धनगर, यांची उपस्थिती होती.

