‘मी राष्ट्रपतीपदाच्या रेसमध्ये नाही’, शरद पवारांचं मोठं विधान

0

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी उद्या विरोधकांची नवी दिल्लीत बैठक होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Election) भाजपला (BJP) तोड देण्यासाठी विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणूनही चर्चेत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही पवारांच्या नावासाठी अनुकुलता दर्शवले आहे. मात्र, विरोधकांच्या बैठकीपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. मी राष्ट्रपतीपदाच्या रेसमध्ये नाहीये, असं खुद्द शरद पवार यांनीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत पवारांच्याच नावावर चर्चा होणार की आणखी काही नावं राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पुढे येतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विरोधी पक्षांकडून मी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नाहीये, असं शरद पवारांनी सांगितलं. राष्ट्रवादीची काल बैठक पार पडली. यावेळी पवारांनी ही माहिती दिली. पवारांच्या या विधानामुळे विरोधी पक्षात नाराजीचा सूर आहेत. काँग्रेसनेही राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पवारांच्या नावाला पाठिंबा दिला होता.

शरद पवार यांच्या नावाची राष्ट्रपतीपदासाठी चर्चा सुरू असून पवारांच्या नावाला आम आदमी पार्टीनेही पाठिंबा दिला आहे. शरद पवार हे राष्ट्रपतीपदासाठीअत्यंत योग्य उमेदवार आहेत, असं आपचे नेते संजय सिंह यांनी सांगितलं. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या अनेक निवडणुकीत पवारांच्या नावाची चर्चा होत होती. मात्र, पवारांनी वेळोवेळी या चर्चांना पुर्णविराम दिला होता. मात्र, यावेळी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव स्वत: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सूचवल्याचं सांगितलं जातं.

पवारांना यांचा पाठिंबा 

काँग्रेस, आम आदमी पार्टी, डीएमके, टीएमसी आणि शिवसेनेने पवारांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पसंती दर्शवली आहे. संजय सिंह यांच्यासह काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होणार असल्याची चर्चा जोरात आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे उद्या 15 जून रोजी ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने विरोधकांची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.