प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामाचा भाचीवर प्राणघातक हल्ला

महिला दिनाच्या दिवशी घडलेल्या घटनेने खळबळ; पिंप्री येथील घटना

0

प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामाचा भाचीवर प्राणघातक हल्ला

महिला दिनाच्या दिवशी घडलेल्या घटनेने खळबळ; पिंप्री येथील घटना

यावल ;- प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामाने आपल्या भाचीवर विळ्याने प्राणघातक हल्ला केला. तरुणीच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिला वाचविण्यासाठी धावलेल्या नणंदेचाही हल्ल्यात हात आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना शनिवारी यावल तालुक्यातील पिंप्री येथे घडली. महिला दिनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

पाडळसे येथील चेतन वासूदेव कोळी यांनी उल्हासनगरच्या वैष्णवी विनोद तायडे हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर ते पिंप्री येथे आपल्या नंदोईच्या घरी आले होते. ही माहिती मिळताच, पाडळसे येथील उमाकांत चिंधू कोळी हे शनिवारी सकाळी पिंप्री येथे आले. त्यांनी भाची वैष्णवीवर केळी कापण्याच्या विळ्याने हल्ला केला. तिला वाचविण्यासाठी धावलेल्या नणंद वैशाली सपकाळे हिला देखील हात आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.

वैष्णवी लहानपणापासून मामाकडेच राहत होती. तिचे बालपण उमाकांत कोळी यांच्या संगोपनात गेले होते. तिने प्रेमविवाह केल्यामुळे उमाकांत कोळी नाराज होते, आणि त्यातूनच त्यांनी हे कृत्य केले, अशी चर्चा गावात आहे.

ग्रामस्थांनी वैष्णवी आणि वैशाली यांना उमाकांत कोळी यांच्या तावडीतून सोडविले. दोघींना यावल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. वैष्णवीची प्रकृती चिंताजनक आहे. उमाकांत कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांच्या कार्याचा गौरव केला जात असताना, या घटनेने समाजात खळबळ माजविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.