चार दिवस ढगाळ वातावरण, वादळी पावसाचा इशारा
जळगाव : राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता काहीशी कमी झाली असून आता मान्सूनपूर्व पावसाची सक्रियता वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता असून शेतकरी वर्गातही आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या कालावधीत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच वेगवान वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून काही भागांत तुरळक गारपिटीचाही अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागांत झालेल्या हलक्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. तापमानातही घट नोंदविण्यात आली असून सोमवारी कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. आगामी दिवसांत पावसाच्या शक्यतेमुळे तापमानात आणखी घसरण होण्याचा अंदाज आहे.
नाशिक, संभाजीनगरसह काही जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील नाशिक तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी वादळी पाऊस आणि तुरळक गारपिटीचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील बहुतांश भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत तापमानात घट झाली असली तरी वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उकाडा कायम आहे. दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता जाणवत असून ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार होत असल्याचे चित्र आहे.
केरळ किनाऱ्यावर मान्सूनचे आगमन समीप
देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेला नैऋत्य मान्सून आता केरळच्या किनाऱ्याजवळ पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार अरबी समुद्रात मान्सूनसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असून पुढील दोन दिवसांत केरळसह दक्षिण तमिळनाडूच्या काही भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
यंदा १६ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांमध्ये वेळेपूर्वी प्रवेश करून मान्सूनने दमदार सुरुवात केली होती. त्यामुळे केरळमध्येही त्याचे आगमन नेहमीपेक्षा लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र वातावरणातील बदलांमुळे त्याच्या पुढील प्रवासाला काहीसा विलंब झाला. तरीही पुढील ४८ तासांत केरळ, लक्षद्वीप, दक्षिण तमिळनाडू तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांत मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीपूर्व कामांना चालना मिळण्याची अपेक्षा असून राज्यातील शेतकरी आता मान्सूनच्या अधिकृत आगमनाची प्रतीक्षा करत आहे.


