लंडनमध्ये साताराच्या “प्रवीण निकम” यांचा सन्मान

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभावशाली काम करणाऱ्या प्रतिभावान देशातील 75 युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल व नेशनल इंडियन स्टुडंट अँड अलूमनी युनियन च्या माध्यमातून लंडन येथे करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील सातारा येथील प्रवीण निकम याचा सन्मान करण्यात आहे. लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतल्यांनंतर प्रवीण सध्या समता सेंटर या संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी काम करत आहे. महाराष्ट्रातून प्रवीण निकम यांच्यासह चैतन्य मारपकवार, राजू केंद्रे, विवेक गुरव यांचा सन्मान लंडन येथे करण्यात आला आहे.

मेहनतीने गाठले लंडन

मूळ साताऱ्यातील आसू पवारवाडीतील असणारे प्रवीण यांचे वडील नोकरीसाठी शेती सोडून पिंपरी-चिंचवडला स्थायिक झाले. वडील पिंपरीतील एका कंपनीत कामगार तर आई गृहिणी. आर्थिक संकटांना न घाबरता, दिवाळीतील उटणे, फिनाईल विकून, बिकट परिस्थितीत सुद्धा आपल्या मुलांचे शिक्षण चालू ठेवलं. पिंपरी-चिंचवडच्या कामगार वसाहतीत जेमतेम परिस्थितीत लहानाचा मोठा झालेल्या प्रविणने नामांकित चेवेनिंग शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी थेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सपर्यंत गरुडझेप घेतली.

भारतातील तरुणाईला उच्च शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी प्रवीणने समता केंद्राची स्थापना केली. समता केंद्र ही नुसती शिक्षणावर काम करणारी संस्था नाही तर नेतृत्व, कौशल्य निर्माण करणार एक केंद्र बनत आहे. योग्य मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना चांगल्या विद्यापीठांमध्ये अर्ज करता येत नाहीत. आर्थिक अडचणी किंवा प्रवेश प्रक्रिया किंवा शिष्यवृत्तीची माहीत नसते. हीच असमानता ज्ञानाने दूर करून प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये बहुजन तृतीयपंथी व दुर्बल तरुणाईला प्रतिनिधित्व कसं मिळेल यासाठी समता सेंटर काम करत आहे. कौशल्य विकास कार्यक्रमही राबवत आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणातील विषमता संपवून भारत आणि जागतिक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे आणि भारतातील शिक्षकांचा क्षमता विकास या दोन पातळीवर रचनात्मक काम तो करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.