मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क
मनवेल येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेचे उपक्रमशील शिक्षक राकेश चिंधू महाजन यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल यांच्यातर्फे शिक्षकांसाठी आयोजित जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती व वर्गसजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. हे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आदिवासी विकास विभाग नाशिकचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांच्या हस्ते सत्रासेन आश्रमशाळेमध्ये आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी देण्यात आले. यावेळी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सत्रासेन आश्रमशाळा अध्यक्ष ज्ञानेश्वर भादले, सहायक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी मिनाक्षी सुलताने, एल.एम.पाटील, यावल आदिवासी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग, विविध आश्रमशाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
या यशाबद्दल मनवेल आश्रमशाळा संस्थेचे अध्यक्ष हुकूमचंद पाटील, उपाध्यक्ष बी.एल. देशमुख, सचिव मीरा पाटील, संचालक यादव पाटील व देवीदास पाटील, खजिनदार अॅडव्होकेट ललित पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक संजय अलोणे, माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील, अधीक्षक वसंत पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी शिक्षक राकेश महाजन यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
शिक्षक राकेश महाजन यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या सन्मानार्थ त्यांना यापूर्वी देखील राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, क्रियाशील शिक्षक पुरस्कार, महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, कर्तृत्ववान आदर्श शिक्षक पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.