नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
बिहार लोकसेवा आयोगाची (BPSC) 70वी प्राथमिक परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत असलेले जन सूरज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांना पाटणा पोलिसांनी भल्या पहाटे आंदोलनस्थळावरून जबरदस्तीने ताब्यात घेतले. प्रशांत किशोर यांच्यासोबत पोलिसांनी अमानुष कृत्य केल्याचा आरोप जन सुराज पार्टीने केला आहे. पोलिसांनी प्रशांत किशोरर यांना मारहाण केल्याचा आरोप जन सुराज पार्टीने केला आहे.
पोलिसांनी प्रशांत किशोर यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच समर्थक विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घातला. पोलिस आणि आंदोलकामध्ये बाचाबाची झाली. मात्र पोलिसांनी अखेर प्रशांत किशोर यांना ताब्यात घेतले. विद्यार्थी आणि पोलिस यांच्यातील हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रशांत किशोर बीपीएससी ची 70वी प्राथमिक परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी पाटणाच्या गांधी मैदानात गांधी पुतळ्याखाली आमरण उपोषण करत होते. सोमवारी पहाटे चार वाजता मोठ्या संख्येने पोलीस आले आणि प्रशांत किशोर यांना घेऊन गेले. जन सुराजच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की, पोलिसांनी या काळात प्रशांत किशोर यांना थोबडीतही मारली. पोलिसांनी प्रशांत किशोर यांना पाटणा एम्समध्ये नेले आहे, जिथे त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
बिहार लोकसेवा आयोगाने (BPSC) 13 डिसेंबर रोजी घेतलेली ७०वी एकात्मिक (प्राथमिक) स्पर्धा परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी जन सुराज पार्टीचे संस्थापक गुरुवार, २ जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. तथापि, बीपीएससीने 13 डिसेंबरच्या परीक्षेत बसलेल्या काही निवडक उमेदवारांसाठी पुनर्परीक्षेचे आदेश दिले होते. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. यानंतर पटना येथील २२ केंद्रांवर शनिवारी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. ज्यामध्ये एकूण 12,012 उमेदवारांपैकी सुमारे 8,111 उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड केले होते. मात्र, शनिवारी, 4 जानेवारी रोजी केवळ 5,943 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेला हजेरी लावली. बीपीएसससी ने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व केंद्रांवर पुनर्परीक्षा शांततेत पार पडली आणि कोणत्याही प्रकारची गैरप्रकार किंवा अनियमितता आढळली नाही.