मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पानीपत झालेले असताना, त्यांच्या पत्नीला बारामतीत दारुण पराभवाचा सामना करावा लागलेला असताना पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना मात्र दिलासा मिळालेला आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात पटेल यांचे मुंबईतील फ्लॅट्स सक्तवसुली संचलनालयाने जप्त केले होते. त्यामुळे पटेल अडचणीत आले होते. पण आता या फ्लॅट्सवरील जप्ती मागे घेतली जाणार आहे.
मनी लॉण्ड्रिंगविरोधी कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या लवादानं प्रफुल पटेलांना दिलासा दिला आहे. पटेल यांच्या फ्लॅट्सवर झालेली जप्तीची कारवाई मागे घेण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. मुंबईतील वरळी भागात असलेल्या सीजय हाऊस इमारतीत 12 ते 15 मजल्यांवर पटेल यांच्या मालकीचे अनेक फ्लॅट्स आहेत. त्यांचे बाजारमूल्य तब्बल 180 कोटी रुपयांच्या घरात आहे. सीजय हाऊसमधील 7 फ्लॅट्स ईडीने 2022 मध्ये जप्त केले होते. या फ्लॅट्सची मालकी प्रफुल पटेल, त्यांच्या पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्सकडे आहे. ड्रग माफिया इक्बाल मिर्चीच्या पत्नीकडून पटेल यांनी फ्लॅट्सची खरेदी केले, त्यासाठी बेकायदेशीर व्यवहार केले, असा ईडीचा आरोप होता. पण लवादानं जप्तीच्या कारवाईविरोधात आदेश देत ईडीला झटका दिला.
ईडीने केली कान उघाडणी
पटेल यांच्या मालकीच्या संपत्तीचा मनी लॉण्ड्रिंगशी संबंध नाही. त्या फ्लॅट्सचा संबंध इक्बाल मिर्चीशी नाही, असे लवादाने सुनावणीत म्हटले. 14000 चौरस फुटांचे हझरा मेमन आणि त्यांच्या दोन मुलांच्या मालकीचे फ्लॅट्स स्वतंत्रपणे जप्त करण्यात आले. त्यासोबतच पटेल यांच्या मालकीचे 14000 चौरस फुटांचेच फ्लॅट्सही जप्त केले गेले. या फ्लॅट्सच्या गुन्ह्यांशी संबंध नव्हता. त्यामुळे जप्तीची गरज नव्हती, अशा शब्दांत लवादाने ईडीची कानउघाडणी केली.