निवडणूक ‘चाणक्य’ प्रदीप रायसोनींची पुन्हा एंट्री ?

महानगरपालिका निवडणुकीत होणार सक्रीय, महायुतीकडून मिळणार संधी

0

जळगाव, लोकशाही विशेष 

दीपक कुलकर्णी

विविध निवडणुकांचे ‘चाणक्य’, महानगरपालिका प्रशासनावर पकड असलेले माजी महापौर प्रदीप रायसोनी हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीकडून त्यांच्या नेतृत्वात महापालिका निवडणूक लढविण्याचा खल सुरु असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेसाठी येत्या एप्रिल महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता असून त्यासाठी महायुतीने आतापासूनच हालचाली गतिमान केलेल्या आहेत. गत काळात ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेवर एकहाती अंमल होता. दादांच्या स्वप्नातील योजनांची अंमलबजावणी करुन माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी शहराच्या विकासाला वेगळा आयाम दिला होता. महानगरपालिका प्रशासनावर त्यांची असलेली पकड व सर्व पक्षीय नेत्यांशी असलेले संबंध लक्षात घेता महायुतीकडून त्यांच्या नावावर खल सुरु आहे. सन 2023 मध्ये प्रदीप रायसोनी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून ‘आपण निवडणूक लढू शकतो का?’ अशी विचारणा देखील केली होती. मात्र त्यावेळी त्यांनी सहभाग घेतला नव्हता. खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून प्रदीप रायसोनी यांनी महानगरपालिकेत 1985 ते 2007 या प्रदीर्घ काळात विविध जबाबदाऱ्या देखील निभावल्या आहेत. सद्यस्थितीत महायुतीकडे महापालिका सांभाळेल असे नेतृत्व नसल्याची चर्चा असल्याने महायुतीचे नेते ‘चाणक्यां’च्या शोधात असून प्रदीप रायसोनी यांना गळाला लावण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न देखील सुरु झाले आहेत. गेल्या पाच वर्षात महापालिकेत भाजपा व शिवसेना (उबाठा) यांच्या आलटून पालटून सत्तेचा खेळ झाला. सुरुवातीला शिवसेनेचे नगरसेवक भाजपासोबत सत्तेत होते, मात्र त्यांच्यात दरी वाढल्याने त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करीत भाजपाला धक्का दिला होता. यातून आता भाजपा सावध झालेला असून ते आता ‘ताकही फुंकून’ पीत असून त्यातूनच ‘चाणक्या’चा शोध घेतला जात आहे.

समन्वयकाची राहणार भूमिका

माजी महापौर प्रदीप रायसोनी यांना महानगरपालिकेचा गाढा अभ्यास असून शहरात कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जावे याचे उत्तम व्यवस्थापन देखील आहे. महापालिका प्रशासनावर त्यांची पकड असून त्यांचा शहर विकासाचा मोठा अभ्यास आहे. नव्या समीकरणानुसार प्रदीप रायसोनी हे प्रत्यक्ष निवडणुकीत उतरणार नसले तरी समन्वयकाच्या भूमिकेतून ते लक्ष ठेवतील अशी आखणी केली जात आहे.

तूर्तास विचार नाही…

राजकारणात सक्रिय व्हायचे की नाही हे अद्याप ठरविलेले नाही. तूर्तास कुठलाही विचार आपण केलेला नाही. महानगरपालिका निवडणुकांना अद्याप अवकाश असून योग्य वेळी काय निर्णय घ्यायचा तो विचार करुन घेतला जाईल. महायुतीकडून कुणीही संपर्क केला नाही. 

– प्रदीप रायसोनी, माजी महापौर, जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.