जळगाव : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अर्ज पडताळणी प्रक्रियेनंतर लाखो महिला अपात्र ठरल्याचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणात महिलांना दिलासा देणारे स्पष्टीकरण दिले आहे.

योजनेअंतर्गत ई-केवायसी आणि कागदपत्रांच्या सखोल पडताळणीनंतर सुमारे ७० ते ८० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. या प्रक्रियेनंतर राज्यातील पात्र लाभार्थी महिलांची संख्या १ कोटी ६६ लाखांवर स्थिरावली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री महाजन यांनी भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, “अनेक अर्ज अपात्र ठरण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसून त्यामागे तांत्रिक कारणे आहेत. काही महिलांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यात किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी आल्या आहेत. शासनाने यापूर्वीही मुदतवाढ दिली होती. संबंधित त्रुटी दूर करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल.”
तांत्रिक त्रुटी दुरुस्तीसाठी निर्णयाची शक्यता
महाजन यांनी सांगितले की, ज्या अर्जांमध्ये तांत्रिक चुका अथवा अपूर्ण माहिती आहे, त्या महिलांना संधी देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निर्णय घेतला जाईल. त्यामुळे पात्र महिलांनी चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी नमूद केले.
विरोधकांवर साधला निशाणा
यावेळी महाजन यांनी विरोधकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. काही नेते केवळ राजकीय टीका करण्यासाठी हा मुद्दा पुढे करत असून जनतेमध्ये त्यांचा प्रभाव उरलेला नाही, असा दावा त्यांनी केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून अनावश्यक आरोप केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या खासदार Supriya Sule यांनी लाभार्थी संख्येत झालेल्या मोठ्या घटेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. “लाडकी बहीण योजनेसाठी नागरिकांच्या कररूपी पैशांचा वापर केला जातो. जर आता मोठ्या प्रमाणावर लाभार्थी अपात्र ठरत असतील, तर गेल्या वर्षभरापासून शासन अपात्र लाभार्थ्यांनाच निधी वितरित करत होते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. योजनेतील अर्ज पडताळणी आणि अपात्रतेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, शासन तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कोणता निर्णय घेते याकडे लाखो महिलांचे लक्ष लागले आहे.

