लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडालेली दिसून येत आहे. सभापती सुनील महाजन यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, एकूण १८ पैकी तब्बल १३ संचालकांनी त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे महाजन यांच्या सभापतीपदावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांची खुर्ची धोक्यात आल्याचे चित्र आहे.
अविश्वास प्रस्ताव दाखल करणाऱ्या संचालकांनी असा आरोप केला आहे की, सभापती सुनील महाजन हे कारभार करताना इतर संचालकांना विश्वासात घेत नाहीत. बाजार समितीचा कारभार लोकशाही पद्धतीने चालवण्याऐवजी ते मनमानी पद्धतीने निर्णय घेत आहेत. तसेच महत्त्वाचे निर्णय घेताना संचालक मंडळाला पूर्णपणे डावलले जात असल्याची तक्रार या १२ संचालकांनी मांडली आहे.
सोमवारी (दि. २७) या १२ संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत अविश्वास प्रस्तावाचे पत्र अधिकृतरित्या सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यानंतर, नियमानुसार विशेष सभा बोलावली जाणार आहे. या सभेत गुप्त मतदानाच्या माध्यमातून सभापतींचे भवितव्य ठरणार आहे. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत म्हणजेच १२ सदस्यांचे समर्थन सध्या विरोधकांकडे असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, ऑगस्ट २०२५ मध्ये तत्कालीन सभापती शामकांत सोनवणे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करून सुनील महाजन यांनी १३ मतांच्या जोरावर विजय मिळवला होता. त्यानंतर आता त्याच पद्धतीने १२ संचालकांनी महाजन यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे महाजन हे या राजकीय संकटातून मार्ग काढतील की बाजार समितीला नवा सभापती मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर लक्ष्मण पाटील, शामकांत सोनवणे, मनोज चौधरी, योगराज सपकाळे, जयराज चव्हाण, मिलींद चौधरी, पल्लवी देशमुख, हेमलता नारखेडे, संदीप पाटील, समाधान धनगर, अरुण पाटील, लिना महाजन आणि यमुना सपकाळे या संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


