लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष सर्च मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 2 मार्च 2026 रोजी रात्री 11 ते 2 या वेळेत ही कारवाई करण्यात आली.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्ती बार, हॉटेल व धाब्यांवर एकत्र येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना एकत्रित कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार विशेष पथके तयार करून विविध ठिकाणी अचानक तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान 9 एनडीपीएस गुन्हे नोंदविण्यात आले. 196 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून 1 तलवार जप्त करण्यात आली. एकूण 223 हॉटेल व धाब्यांची तपासणी करण्यात आली, तर 2 हॉटेलधारकांवर कारवाई करण्यात आली.
तसेच 47 प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. याशिवाय 10 इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यामध्ये 4 दारूबंदी कायद्यांतर्गत, 5 मोटार वाहन कायद्यानुसार आणि 1 ड्रिंक अँड ड्राईव्हचा समावेश आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.


