मनपा निवडणुकीसाठी जळगाव पोलिस सज्ज; ९० अधिकाऱ्यांसह १,२००हून अधिक अंमलदार तैनात
उपद्रवींवर कारवाई, २५१ शस्त्रे जमा; शांततेत मतदानासाठी कडक बंदोबस्त
जळगाव (प्रतिनिधी):जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक कोणताही अनुचित प्रकार न होता शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस दलाकडून व्यापक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून, ९० पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे १,२०२ पोलिस अंमलदार निवडणूक काळात शहरभर तैनात करण्यात आले आहेत.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये संशयित व उपद्रवी व्यक्तींवर कारवाई, काहींना शहराबाहेर हद्दपार करणे, तसेच संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्याचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांकडून सातत्याने गस्त व देखरेख केली जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण
निवडणूक बंदोबस्तासाठी ९ पोलिस उपअधीक्षक आणि २१ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या मदतीला ६० सहायक व उपनिरीक्षक कार्यरत आहेत. संपूर्ण बंदोबस्तावर पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षक स्वतः लक्ष ठेवून आहेत.
२५१ परवानाधारक शस्त्रे जमा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक नागरिकांकडील एकूण २५१ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. याशिवाय, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कलम १४९ अंतर्गत १५० जणांना नोटीस देण्याचा प्रस्ताव असून, त्यापैकी ६१ जणांना प्रत्यक्ष नोटीस बजावण्यात आली आहे.
असा असेल बंदोबस्त
महानगरपालिका निवडणुकीदरम्यान शहरात पुढीलप्रमाणे पोलिस बंदोबस्त राहणार आहे
९ पोलिस उपअधीक्षक, २१ पोलिस निरीक्षक, ६० सहायक व उपनिरीक्षक, १,०७० पुरुष पोलिस अंमलदार आणि १३७ महिला पोलिस अंमलदार तैनात असतील. याशिवाय, ८ दंगा नियंत्रण पथके, २ शीघ्र प्रतिसाद पथके तसेच १ एसआरपीएफ कंपनी देखील सज्ज ठेवण्यात आली आहे.
एकूणच, जळगाव मनपा निवडणूक शांततेत, निर्भय वातावरणात आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी पोलिस प्रशासनाने बहिस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारली असून, निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेवर कडक नजर ठेवली जाणार आहे.