पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पोलीस कॉन्स्टेबल नामदेव इंगळे यांचा गौरव

0

पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पोलीस कॉन्स्टेबल नामदेव इंगळे यांचा गौरव

शिंदाड (ता. पाचोरा) : पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल नामदेव इंगळे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

नामदेव इंगळे यांनी पोलीस ठाण्यात हजर झाल्यापासून वरखेडी गावातील अवैध धंद्यांवर निर्बंध घालण्यासह, दर गुरुवारी भरणाऱ्या गुरांच्या आठवडे बाजारात होणाऱ्या वाहतूक आणि चोरीसदृश घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवले. त्यांच्या दक्षतेमुळे या परिसरातील चोऱ्यांचे सत्र थांबले असून, वाहतुकीला शिस्त लागली आहे.

मार्च महिन्यात इंगळे यांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अंतर्गत गुन्हे दाखल करून, ते पाचोरा न्यायालयातील लोकन्यायालयात यशस्वीरीत्या शाबित केले. त्याचप्रमाणे, गु.र.नं. ३०३/२०२४ मधील फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात यश मिळवले.

याशिवाय, आपल्या वरखेडी बिट अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ न देता, सामाजिक सौहार्द जपले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांचा जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे गौरव करण्यात आला.

“आज मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. परंतु ही कामगिरी माझ्या वरिष्ठ अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाली,” असे भावनिक उद्गार पोलीस कॉन्स्टेबल नामदेव इंगळे यांनी यावेळी काढले.

Leave A Reply

Your email address will not be published.